Ujjwal Nikam On Operation Tiger : दिल्ली येथे आज ठाकरे गटाची संसदीय दलाची बैठक सुरु असून या बैठकीत हजर राहण्यासाठी शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. तसेच जे खासदार या बैठकीत हजर राहणार नाही त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे आता भाजप खासदार आणि ज्येष्ठ विधीतज्ञ उज्ज्वल निकम यांनी या संपूर्ण प्रकरणावर महत्त्वाची माहिती दिली आहे.
पक्षांतर्गत बैठकांना व्हीप लागू होत नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी दिली आहे. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालाचा दाखला देखील दिला आहे. व्हिप फक्त सभागृहातल्या मतदानावरील भूमिकेसंबंधी असतो असं उज्ज्वल निकम म्हणाले.
जर हे सहा खासदार व्हीप जारी होण्याच्या अगोदर दुसऱ्या राजकीय पक्षात विलीन झाले नसतील तर लोकसभा अध्यक्षांना वेगळा गट निर्माण करण्याचा आणि व्हीप काढण्याचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांकडे ठेवला का हा प्रश्न आहे. जर प्रस्ताव ठेवला तर लोकसभा अध्यक्षांनी काय कारवाई केली. गट नेता लोकसभा अध्यक्षांनी निवडला का? हे देखील पाहावं लागणार आणि जर असं झालं तर गट नेता निवडण्याचा आणि व्हीप काढण्याचा अधिकार हा त्या गटाला जातो असं देखील यावेळी उज्ज्वल निकम म्हणाले.
बैठकीत हजर राहणारे खासदार
आज दिल्ली येथे आयोजित ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या बैठकीत राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह लोकसभा खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) , अनिल देसाई (Anil Desai) , राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) उपस्थित आहे. तर परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ- वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकरांनी गैरहजर असल्याने आता ठाकरे गटाकडून त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
व्हीप कधी लागू होतो, काय आहेत नियम?
व्हिप कुठे लागू होतो?
विधानसभा किंवा संसदेच्या सभागृहात, मतदानाच्या वेळी पक्षाचा अधिकृत ‘व्हिप’ लागू होतो. पक्षाच्या अंतर्गत बैठकांसाठी तो कायदेशीररित्या बंधनकारक नसतो.
अपात्रतेचा नियम
‘पक्षांतर बंदी कायद्या’ नुसार सभागृहात व्हिपचे उल्लंघन केल्यास
आमदार किंवा खासदार अपात्र ठरू शकतात. पक्षाच्या अंतर्गत बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे कायदेशीररित्या सदस्यत्व रद्द होऊ शकत नाही.
अंतर्गत बैठकीचे महत्त्व
बैठकीला न आल्यास पक्ष त्या सदस्यावर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करू शकतो किंवा त्यांना पक्षातून काढू शकतो. मात्र, संविधानानुसार त्यांचे निवडून आलेले पद हिरावून घेण्याचा अधिकार पक्षाला अंतर्गत बैठकीच्या मुद्द्यावरून मिळत नाही.
ठाकरे गटाला मोठा धक्का: बैठकीकडे 6 खासदारांची पाठ, फुटीवर शिक्कामोर्तब!-
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांनुसार, पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी व्हिपचे उल्लंघन हे सभागृहाच्या आत (मतदानाच्या किंवा महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी) झालेले असणे आवश्यक आहे, अंतर्गत बैठकीत नाही.
