नागपूर : भ्रष्टाचाराच्या आरोपात तब्बल 13 महिने 28 दिवस कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) नागपुरातील (Nagpur) निवासस्थानी पोहचले. त्यापूर्वी त्यांचे नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची विमानतळावरुन कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. यासाठी दोन थार गाड्या सजवण्यात आल्या होत्या. रॅली कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. गाड्यांवर फुलांची सजावट करण्यात आली होती. सात ते आठ किलोमिटर रॅली काढण्यात आली होती.
तब्बल 21 महिन्यानंतर प्रथमच अनिल देशमुख नागपूरात दाखल झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत होता. नागपुरातील त्यांच निवासस्थान फुलांनी सजविण्यात आलंय. रंगरंगोटी, रोषणाई करण्यात आलीय. निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी करण्यात आलीय.
अनिल देशमुख यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्यावर फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आहे. 12 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला. तरी देखील कारागृहाबाहेर येण्यासाठी 28 डिसेंबरचा दिवस उजेडावा लागला होता.
त्यानंतर अखेर आज अनिल देशमुख नागपूरला परतले आहे. अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ईडीने लावलेल्या आरोपातही तथ्य नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले होते.