Amravati News : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढू असा इशारा शिंदे गटाने दिला आहे. तर दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीचा उमेदवार भाजपाचाच राहिल असे सांगत या वादाला आणखी हवा दिली आहे.
अमरावतीचा तिढा! शिंदे गटाचा दावा, रवी राणांचाही NDA नेत्यांना सज्जड दम
बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रामटेक मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा उमेदवार तिथून लढणार आहे आणि अमरावतीची जागा मात्र भाजपकडेच राहिल. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चांवरही बावनकुळे म्हणाले, अमरावती मतदारसंघात काही मतभेद आहेत. बच्चू कडू किंवा अडसूळ यांच्यात मतभेद असतील. मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी सगळेच प्रयत्न करतील. त्यामुळे बच्चू कडू आमच्यासोबतच राहतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
अमरावतीची जागा भाजपकडे आहे. त्यामुळे ही जागा आम्ही लढू आणि शंभर टक्के जिंकू यात काहीच शंका नाही. या मतदारसंघात विजयी होण्यासाठी महायुतीचे सर्व नेते एकत्र येतील. महायुतीत कोणताही तिढा नाही. फक्त पाच मिनिटांत सगळे प्रश्न सुटतील अशी परिस्थिती आहे. सध्या फक्त सहा ते सात जागांचा तिढा आहे. यांवर चर्चेतून मार्ग काढला जाईल. रामटेकची जागा शिंदे गटाकडे असल्याने त्यांना देऊ. पण अमरावतती मतदारसंघ भाजपकडेच राहिल असे बावनकुळे म्हणाले.
नवनीत राणांना केवळ आमंत्रण पण, त्यांचा पक्षप्रवेश नाही; चर्चांना बावनकुळेंचा फुलस्टॉप
नवनीत राणांना पुन्हा उमेदवारी?
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनाच पुन्हा तिकीट मिळेल असे सांगितले जात आहे. परंतु, त्यांच्या विरोधात महायुतीतील नेत्यांनी आव्हान देण्याची भाषा सुरू केली आहे. अमरावतीची जागा शिंदे गटाची आहे. तेव्हा या जागेवरून आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ येथून लढतील. जर नवनीत राणा यांना भाजपाने उमेदवारी दिली तर स्वचः अपक्ष लढणार असा निर्धार अडसूळ यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अमरावतीच्या जागेवरून अमरावतीत तिढा निर्माण झाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात अभिजीत अडसूळ राणांचे राजकीय विरोधक आहेत. 2019 च्या निवडणुकीत अभिजीत अडसूळ यांचा पराभव करत नवनीत राणा विजयी झाल्या होत्या.