Download App

Video : ‘आम्हाला काम नाही, माती खायची का?’ भर रस्त्यात महिलेने बावनकुळेंना फटकारले

BJP : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे सध्या संकल्प ते समर्थन यात्रेत राज्यभरात (Chandrashekhar Bawankule) फिरत आहेत. या यात्रेत नागरिकांशी संवाद साधत 2024 मध्ये पंतप्रधान कोण?, असा प्रश्न ते विचारतातच. मात्र हाच प्रश्न त्यांना आता अडचणीचा ठरू लागला आहे. अनेक ठिकाणी त्यांची (BJP) फजिती होत आहे. आताही असाच प्रकार वर्धा शहरात घडला. बावनकुळे यांची फजिती कशी झाली याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने फिरत आहे. बावनकुळे यांची चांगलीच फजिती झाल्याचे दिसत आहे.

वर्धा शहरात भाजपकडून संकल्प ते समर्थन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात बावनकुळे नागरिकांशी संवाद साधत होते. वर्दळीच्या परिसरातील साई मंदिर ते अंबिका चौकापर्यंत यात्रेदरम्यान त्यांनी एका महिलेला 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे? असा प्रश्न विचारला. यावर मात्र ती महिला चांगलीच संतापली. सरकार विजेचे बिल वाढवून देते. सिलिंडर वाढवून देते. आम्हाला काम धंदे नाही, माती खायची का? असा सवाल या महिलेने विचारला. त्यावर मात्र बावनकुळेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यांनी माईक बाजूला करत महिलेचे बोलणे थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही स्टेजवर चला, आपण स्टेजवर बोलू, असे त्यांनी महिलेला सांगितले. मात्र त्यावर महिला आणखीच संतापली. स्टेजवर बोलायचे मग लोकांना रस्त्यावर का विचारता, अशीच चर्चा महिलांमध्ये सुरू होती.

Uddhav Thackeray : आधी ‘पेगासस’, आता ‘अ‍ॅपल’; फोन हॅकिंग वादात ठाकरे गटाची उडी

या अभियानांतर्गत बावनकुळे राज्यभरात फिरत आहेत. नागरिकांशी संवाद साधत आहेत. वर्धा शहरात घडलेल्या प्रसंगाने मात्र त्यांची चांगलीच फजिती झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बावनकुळे यांच्या यात्रेदरम्यान त्यांना काही ठिकाणी अशा पद्धतीने लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

युवकाने घेतलं राहुल गांधींचं नाव 

याआधी रायगड जिल्ह्यातही बावनकुळेंना असाच अनुभव आला होता. तरी देखील त्यांनी यातून काही धडा घेतला नाही. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे महाविजय 2023 संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत बावनकुळे दारोदारी जाऊन नागरिकांशी संवाद साधत होते. 2024 मध्ये पंतप्रधान कोण पाहिजे या त्यांच्या प्रश्नाला अनेक जण मोदींचे नाव घेत होते. तर काही जण काहीच बोलत नव्हते. यानंतर त्यांचा ताफा एका टोपीवाल्याच्या दुकानात पोहोचला. हाच प्रश्न बावनकुळे यांनी विचारला. त्यावेळी तेथील तरुणान थेट राहुल गांधींचे नाव घेतले. त्यावेळीही बावनकुळे यांची अशीच फजिती झाली होती.

Tags

follow us