Download App

“राष्ट्रवादी अजित पवारांची अन् अजित पवार भाजपाचे”; नार्वेकरांच्या निकालावर वडेट्टीवारांचा खोचक टोला

Vijay Wadettiwar Criticized Ajit Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेला निकालही शरद पवार गटाच्या विरोधात गेला. अजित पवार यांचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. त्यांच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या निकालावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार काल चंद्रपुरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजप (BJP) आणि अजित पवार गटावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची झाली अन् अजित पवार (Ajit Pawar) भाजपाचे अशी खोचक टीका वडेट्टीवार यांनी केली.

अजित पवार यांनी पदासाठी पक्षाची विचारसरणी गहाण ठेवली. ज्या पद्धतीने असे निकाल दिले जात आहेत ते खरंच धक्कादायक आहे. राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ आहे. या घड्याळाचा काटा कितीही जोरात फिरला तरीही तो सेकंदातच मोजला जातो आणि तासकाटा कितीही हळू फिरत असला तरी तो तासकाटाच असतो आणि सेकंदकाटा हा सेकंदकाटाच असतो. त्यामुळे येणारा काळ हा अजित पवार यांच्यासाठी सेकंदांचाच ठरणार आहे. जो मूळ पक्ष आहे तो शरद पवार (Sharad Pawar) यांचा तासकाटाच ठरेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

‘मूळ राष्ट्रवादीचे ‘दादा’ अजित पवारच’ विधानसभा अध्यक्षांचा शरद पवार गटाला दणका

यानंतर त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. डोळे बंद करून, मेंदू बधीर करून आणि कानात बोळे घालून हा निकाल दिला गेला आहे. त्यांच्याकडून आता पारदर्शक निकालाची अपेक्षा करणेच गैर आहे. आता फक्त स्रर्वोच्च न्यायालयाकडूनच (Supreme Court of India) अपेक्षा राहिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून जो निकाल येईल तो देशातील राजकारण्यांसाठी मोठा धडा देणारा असेल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

मूळ राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अपात्र आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिला. या निकालामध्ये मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘दादा’ अजित पवारच असल्याचे निकाल राहुल नार्वेकरांनी म्हटले. दहाव्या परिशिष्टानूसार मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला. त्यामुळे आता खरी राष्ट्रवादी ही अजित पवार यांचीच असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच आणि पक्षाचं चिन्ह घड्याळ अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल देताना अजित पवार गटाचा एकही आमदार अपात्र ठरवलेला नाही.

follow us

वेब स्टोरीज