Devendra Fadnavis on Maharashtra Elections : महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा तेव्हा भाजप आणि मित्र पक्षांना त्याचा फायदा होतो. आताही मला वाटतं की या वाढलेल्या मतदानाचा फायदा आम्हाला होईल आणि राज्यात पुन्हा आमचं सरकार येईल असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, आम्ही मतदारसंघातील बूथनिहाय आकडेवारी जमा केली आहे. आमच्याकडे जो प्राथमिक फिडबॅकही आला आहे. त्यानुसार मतदानात महिलांची टक्केवारी वाढल्याचे दिसत आहे. यानंतर पत्रकरांनी अपक्षांशी संपर्क साधला जात आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले भारतीय जनता पार्टी आणि आम्ही अद्याप कुणाशीही संपर्क केलेला नाही.
दरम्यान, आज काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर हल्लाबोल केला. अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे वादात सापडलेल्या गौतमबाबत राहुल गांधी म्हणाले की, अमेरिकन एजन्सीने अदानींना रंगेहाथ पकडले आहे, मात्र भारतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसून, अदानींना आजच अटक करण्याची मागणी राहुल गांधींनी केली. अदानींनी 2000 कोटींचा घोटाळा केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे पाठिराखे असल्याने अदानींना अटक होणार नसल्याचे राहुल गांधी आज पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
याबाबत विचारले असता फडणवीस यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं. राहुल गांधी नेहमीच अदानींवर आरोप करत असतात त्यात नवीन काहीच नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Vidhansabha Election : देवेंद्र फडणवीसांचा प्रचाराचा झंझावात, 13 दिवसांत घेतल्या 64 सभा
विधानसभा निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. महायुतीत काय असे विचारले असता फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रिपदाबाबत अजून कोणतीच चर्चा झालेली नाही. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तिन्ही पक्ष एकत्रित बसून योग्य निर्णय घेतला जाईल असे फडणवीस म्हणाले. आता साधारणपणे मतदानाची टक्केवारी वाढली आहे त्यात सरकारच्या बाजूने लोकांचा कल असू शकतो असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.