नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी गडचिरोलीचा दौरा केला. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील पिपली बुरगी येथील बहुप्रतिक्षित क्रांतिवीर बाबूराव शेडमाके-कोठी कोरनार पुलाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय विविध विकास कामांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. फडणवीसांच्या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच शासन अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील पिपली बुरगी इथे पोहचले आहे. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis visited Gadchiroli on Independence Day)
पिपली बुरगी हे ठिकाण अतिसंवेदनशील असल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात कोणतेही मुख्यमंत्री अथवा मंत्री आजपर्यंत याठिकाणी आले नव्हते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी तिथे जाऊन उदघाटन केले. महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणारा हा महत्वाचा पुल आहे. सुमारे 16 गावे पावसाळ्यात पूर्णपणे संपर्कातून तुटत होती. त्यांना आता या पुलामुळे मोठी सुविधा यामुळे मिळणार आहे, अशी भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या कामाची हवाई पाहणी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मार्गात केली.
HUGE STEP !
5000 citizens & 16 villages' connectivity used to break every monsoon for around 4 months!
As I had promised, this long-due connectivity issue got resolved today as we inaugurated the Krantiveer Baburao Shedmake Kothi Kornar bridge in Gadchiroli. this will bring big… pic.twitter.com/HLZSPW3PD3— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 15, 2023
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुरजागड येथे पोलिस बॅरेक प्रशासकीय इमारतीचे उदघाटन त्यांनी केले आणि लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात पोलिस मदत केंद्र, पुरुष वसतीगृह व महिला वसतिगृहाचा समावेश आहे. तिथून अहेरीपर्यंत प्रवास करीत पोलिस कँटिन, पोलिस लायब्ररी, पोलिस गार्डनचे उदघाटन केले. एक गाव एक वाचनालय याअंतर्गत पोलिस संकुल, अहेरी येथे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. शालेय मुलींना फडणवीस यांच्या हस्ते सायकलचेही वाटप करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथील पोलिस उपमुख्यालय प्राणहिता येथे शहीद स्मारक उभारण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी देवेंद्र फडणवीस यांनी शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसंच नक्षलविरोधी अभियानात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व शौर्य पुरस्कारप्राप्त पोलिस अधिकारी व जवानांना त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कालच गडचिरोली पोलिस दलातील 33 पोलिसांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले होते. त्यांना व नक्षलविरोधी अभियानात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रशस्तीपत्र दिले आणि त्यांचा सत्कार केला. प्राणहिता येथे चार नवीन बोलेरो व 20 दुचाकी वाहने नव्याने पोलिस दलाला देण्यात आली. याशिवाय अहेरी येथे पाच मोबाईल टॉवरचेही फडणवीस यांनी उद्घाटन केले आणि मोबाईल टॉवर उभारण्यात आलेल्या गावकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला.