काका-पुतण्याची जवळीक; ‘मविआ’त नव्या घडामोडी : आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस अनुकूल
मुंबई : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वाढत्या जवळकीतेमुळे महाविकास आघाडीत वेगळ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. ऐनवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास तयारी म्हणून काँग्रेसने ‘प्लॅन बी’वर काम सुरु केले आहे. याच प्लॅनचा भाग म्हणून काँग्रेस आता वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. हिंदुस्थान टाईम्सने एका वृत्तात याबाबतचा उल्लेख केला आहे. (Mahavikas Aaghadi Congress ready to go with Vanchit Bahujan Aghadi)
काँग्रेसचा ‘प्लॅन बी’ अजित पवार यांच्यासोबतच्या भेटींनंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा शरद पवार यांच्यावरील विश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. त्याचमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने शरद पवारांना बाजूला ठेऊन महाविकास आघाडीचा विचार सुरु केला आहे. पवारांनी ऐनवेळी महाविकास आघाडीची साथ सोडली, निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आपल्याकडे दुसरा प्लॅन तयार असावा, यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं एकमत झालं आहे.
मोठी बातमी : शरद पवारांना बाजूला ठेऊन ‘मविआ’? काँग्रेस अन् ठाकरे गटाची ‘प्लॅन बी’वर खलबत
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दावा केला की, अनेक कारणांमुळे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गटावरचा विश्वास कमी होत आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला ‘प्लॅन बी’ तयार करायचा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात केवळ गुप्त बैठका झाल्या नाहीत. तर काही आमदार वगळता पवार गटातील बहुतांश आमदारांचे मत आहे की त्यांनी विरोधी पक्षात राहू नये, त्यामुळे पक्ष फुटण्यापासून वाचेल. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आमदारांनी पवारांच्या आमदारांशी अनौपचारिक गप्पा मारल्यानंतर पक्ष नेतृत्व या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे.
100 पेक्षा अधिक झटके, मेंदुचा रक्तपुरवठा बंद; बलून अॅंजिओप्लास्टीमुळे 34 वर्षीय रुग्णाला जीवदान
राज्य काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याच्या मतानुसार, पवारांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपशी युती केल्यास आगामी निवडणुकांचा आराखडा तयार करावा, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेससाठी हे फायदेशीर ठरेल. यात उद्धव ठाकरे यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार आणि ठाकरे यांच्यात, ठाकरेंनी भाजपच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे, तर पवार हलगर्जीपणा करत आहेत. त्यामुळे सध्या तरी कोणतीही स्पष्टता नसली तरी, आगामी निवडणुका शिवसेनेसोबत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लढण्यासाठी आम्ही पर्यायी योजना तयार केली पाहिजे.
शिवाय आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबतही आघाडीचा विचार करू शकतो, आगामी काळात ही आघाडी आमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र I.N.D.I.A. बैठकीनंतरच चित्र स्पष्ट होईल, असेही या काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत प्रवेश होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील काँग्रेस नेते महाराष्ट्रावर लक्ष ठेवून :
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील काँग्रेसचे नेतेही महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “आम्ही आमचे नेते राहुल गांधी यांना या घडामोडींची माहिती दिली आहे. ३१ ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या I.N.D.I.A.च्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा केली जाईल. या दरम्यान, रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याशी शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीबाबत चर्चा झाल्याच्या वृत्तालाही पटोलेंनी दुजोरा दिला.