मोठी बातमी : शरद पवारांना बाजूला ठेऊन ‘मविआ’? काँग्रेस अन् ठाकरे गटाची ‘प्लॅन बी’वर खलबत

मोठी बातमी : शरद पवारांना बाजूला ठेऊन ‘मविआ’? काँग्रेस अन् ठाकरे गटाची ‘प्लॅन बी’वर खलबत

मुंबई : काहीही झालं तरी आपण भाजपसोबत (BJP) जाणार नाही आणि आपली भूमिका बदलणार नाही, असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) करत आहेत. मागील काही दिवसांपासून ते वारंवार या गोष्टीबाबत खुलासा करताना दिसत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री आणि बंडखोर नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत होत असलेल्या भेटींनंतर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांचा शरद पवारांवरील विश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. त्याचमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने शरद पवारांना बाजूला ठेऊन महाविकास आघाडीचा विचार सुरु केला आहे. (The Congress is now mulling a Plan B for the upcoming polls in case Pawar ditches them for the BJP now or before the elections)

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी ऐनवेळी महाविकास आघाडीची साथ सोडली, निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आपल्याकडे दुसरा प्लॅन तयार असावा, यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं एकमत झालं आहे. यामुळे या दोन्ही पक्षांकडून ‘प्लॅन बी’ आखणीला सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला फटका बसत असल्याने दोन्ही पक्ष सावध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीशिवाय निवडणूक लढण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे.

‘मी तर अजितदादांच्या स्वागतासाठी बुके घेतला होता’; राजकीय अतिक्रमणाच्या चर्चांना देसाईंचा फुलस्टॉप!

संजय राऊतांची पवारांवर नाराजी :

अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परखड मत व्यक्त करत पवार कुटुंबीयांनाच खडा सवाल विचारला होता. अजित पवार आणि शरद पवारांच्या या भेटीमुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या भेटीमुळे मविआमध्ये धूसफुस वाढू शकते. लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचं नेतृत्व निदान भीष्मपितामहकडून होता कामा नये. रोहित पवारांचंही नातीगोती सांभाळायची वगैरे वक्तव्य ऐकलं. पण मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचं? हा प्रश्न आहे. आमचेही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध आहेत. मग आम्हीही त्यांच्यासोबत चहा पित बसलो तर चालेल का? असा प्रश्न विचारत हे आमच्या डीएनएत नाही असे राऊतांनी म्हटले होते. ते येत्या आठवड्यात शरद पवार यांची भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे.

दिल्लीतील काँग्रेस नेते महाराष्ट्रावर लक्ष ठेवून :

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील काँग्रेसचे नेतेही महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “आम्ही आमचे नेते राहुल गांधी यांना या घडामोडींची माहिती दिली आहे. ३१ ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या I.N.D.I.A.च्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा केली जाईल. या दरम्यान, रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याशी शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीबाबत चर्चा झाल्याच्या वृत्तालाही पटोलेंनी दुजोरा दिला.

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दावा केला की, अनेक कारणांमुळे त्यांचा शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गटावरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला ‘प्लॅन बी’ तयार करायचा आहे. इतकंच नाही तर, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात केवळ गुप्त बैठका झाल्या नाहीत. तर काही आमदार वगळता पवार गटातील बहुतांश आमदारांचे मत आहे की त्यांनी विरोधी पक्षात राहू नये, त्यामुळे पक्ष फुटण्यापासून वाचेल. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आमदारांनी पवारांच्या आमदारांशी अनौपचारिक गप्पा मारल्यानंतर पक्ष नेतृत्व या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे.

100 पेक्षा अधिक झटके, मेंदुचा रक्तपुरवठा बंद; बलून अॅंजिओप्लास्टीमुळे 34 वर्षीय रुग्णाला जीवदान

राज्य काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याच्या मतानुसार, पवारांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपशी युती केल्यास आगामी निवडणुकांचा आराखडा तयार करावा, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेससाठी हे फायदेशीर ठरेल. यात उद्धव ठाकरे यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार आणि ठाकरे यांच्यात, ठाकरेंनी भाजपच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे, तर पवार हलगर्जीपणा करत आहेत. त्यामुळे सध्या तरी कोणतीही स्पष्टता नसली तरी, आगामी निवडणुका शिवसेनेसोबत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लढण्यासाठी आम्ही पर्यायी योजना तयार केली पाहिजे.

शिवाय आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबतही आघाडीचा विचार करू शकतो, आगामी काळात ही आघाडी आमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र I.N.D.I.A. बैठकीनंतरच चित्र स्पष्ट होईल, असेही या काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसमधील या सर्व चर्चांना आणि सुरु केलेल्या प्रयत्नाना उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ते पवारांशिवाय महाविकास आघाडीसोबत पुढे जाणार की तेही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेणार हे आगामी काळातच कळून येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube