Download App

“आमची ताकद काय, लोकसभा निवडणुकीत कळेलच”; जानकरांचा भाजपला रोखठोक इशारा

Mahadev Jankar Criticized BJP : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचे आता भाजपबरोबर खटके उडू लागले आहेत. जानकर यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट करत घणाघाती टीका सुरू केली आहे. राज्यातील ठिकठिकाणच्या दौऱ्यात त्यांनी भाजपविरोधात वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्हीही लहान पक्षांचा फक्त वापर करून घेतात. लोकसभा निवडणुकीत आमची ताकद काय आहे हे त्यांना नक्की कळेल, असा इशारा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी दिला. जानकर यांनी आज भंडारा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला.

जानकर पुढे म्हणाले, आम्ही भाजपबरोबर (BJP) होते त्यावेळी आमचे प्राबल्य होते. त्यापेक्षा आत दुप्पट झाले आहे. त्यावेळी माझ्या पक्षाचे 23 नगरसेवक होते आता माझ्याकडे 98 नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत. भाजप मित्र पक्ष आणि लहान पक्षांचा वापर करून घेतो हेच त्यांचं धोरण आह. मी असेल किंवा राजू शेट्टी, रामदास आठवले यांना भाजपने जवळ केले. मात्र, मोठे नेते आल्यानंतर त्यांना छोट्या माणसांची गरज राहत नाही, अशा शब्दांत जानकर यांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपाला आमची गरज नसल्यास आम्ही स्वतंत्र लढू, महादेव जानकर स्पष्टच बोलले

आज आमची ताकद वाढली आहे. झोपडीतून बंगल्यात आलोय. आमची ताकद वाढविण्यासाठी मी राज्यात सातत्याने फिरत आहे. राज्यात विविध ठिकाणी दौरे सुरू आहेत. भारतीय जनता पार्टीचा जो आधार आहे त्याला बाजूला सारण्याचे प्लॅनिंग आम्ही करत आहोत. आज भाजपाची सत्ता असली तरी वीस वर्षांपूर्वी काँग्रेसच्या (Congress) बाबतीतही असेच होते. त्यांनी निवडणुकीत दगड जरी उभा केला तरी तो निवडून येत होता. त्यावेळी आम्ही काँग्रेसविरोधात लढत होतो. काँग्रेसला माणूस मिळणार नाही असे म्हणत होतो. आज तीच काँग्रेसची व्यथा आहे. त्यामुळे आता भाजप जनतेच्या मनातून कशी जाईल यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष भूमिका घेईल, असे जानकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी निवडणुकांसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. यामध्ये त्यांनी भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत 248 जागा तर शिंदे गटाला 40 जागा देणार आहे. जर त्यांची इच्छाच नसेल आम्हाला सोबत घ्यायची तर आम्ही आमच्या ताकदीवर निवडणुका लढवू तसेच आगामी निवडणुकांमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असे जानकर काही दिवसांपूर्वी म्हणाले.

भुजबळ-मुंडेंनी पक्ष काढला असता तर मुख्यमंत्री होऊन आलो असतो : जानकरांनी सांगितली भुतकाळातील चूक

follow us