Mahadev Jankar : जानकरांना ‘चूक’ उमगली, भाजपला बाजूला ठेवत आखला नवा प्लॅन!
Mahadev Jankar : भाजप (BJP) ज्यावेळी सत्तेत येत नव्हता त्यांना दीड ते दोन टक्के मतांची गरज होती. त्यावेळी त्यांनी आमच्याशी युती केली. सत्ता हस्तगत केली. त्यानंतर मात्र सत्तेचा घमंड डोक्यात शिरला. चूक त्यांची नाही तर आमची आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष सारखेच आहेत. त्यामुळे आता भाजपपासून अंतर राखत पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केले.
एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचे आता भाजपबरोबर खटके उडू लागले आहेत. जानकर यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट करत राज्यातून जनस्वराज्य यात्रा काढली आहे. ही यात्रा काल सांगली जिल्ह्यातील विटा येथे पोहोचली. येथे त्यांनी काँग्रेस (Congress) आणि भाजप दोन्ही पक्षांवर घणाघाती टीका केली.
Mahadev Jankar : राजकारणातली सर्वात मोठी चूक कोणती? जानकरांनी बेधडक सांगूनच टाकलं
काँग्रेस पक्ष हा गद्दार तर भाजप महागद्दार आहे. सध्याचा भाजप हा देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) झालेला आहे. आम्ही गोपीनाथ मुंडेंच्या शब्दावर विश्वास ठेऊन भाजपशी युती केली होती. मात्र सध्या कोणाच्या शब्दावर विश्वास ठेऊन युती करावी असे नेतृत्व ना काँग्रेसमध्ये आहे ना भाजपमध्ये. त्यामुळे आता आम्ही कुणासोबत जायचे याचा निर्णय त्या-त्यावेळी आमच्या पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड घेईल, असे जानकर म्हणाले.
काँग्रेसने त्या काळात बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यात प्रादेशिक पक्ष कमजोर करण्याचे काम केले. आताचा भाजप तेच काम करत आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सारखेच आहेत. त्यामुळे आता भाजपपासून अंतर राखून काम करण्याचा विचार जानकर यांनी बोलून दाखवला.
भाजपबरोबर गेलो हीच मोठी चूक
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आपण भारतीय जनता पक्षाबरोबर आलो होतो मात्र, मुंडे याच्या जाण्याने मी पोरका झालोय. मात्र आगामी काळात भाजपला त्यांची जागा दाखवून देणार आहे. माझा पक्ष हा आगामी काळात भाजपमध्ये विलीन करण्याचे षडयंत्र रचले जात असले तरी ते आपण होऊ देणार नाही. आगामी निवडणुकीत स्वबळावर सर्व जागा लढवणार असून भाजपाबरोबर जाणे ही सर्वात मोठी चूक होती. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा जानकर यांनी कर्जत (जि. नगर) येथील जनस्वराज्य यात्रेवेळी दिला होता.