Maharashtra News : एक ट्रक, त्यात विदेशी दारूचे बॉक्स. दारू नागपूरला पोहोचवण्याचे काम. पोलिसांना सुगावा लागला अन् माहूर रोड परिसरात सापळा रचून ट्रक पकडला इतकी साधी वाटणारी स्टोरी फक्त एका नावाने प्रचंड चर्चेत आली. कारण या दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर महायुती सरकारमधील एका मंत्र्याचं नाव अगदी ठळक अक्षरात लिहीलं होतं. हाच या सगळ्या प्रकरणाचा टर्निंग पॉइंट ठरला. पण, हे राज्यमंत्री कोण? त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध? ट्रकमधून होणारी दारू वाहतूक कायदेशीर होती का? यामागे कुणाचं षडयंत्र तर नाही ना? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या..
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे काल (गुरुवार) रात्री पोलिसांनी एक दारुचा ट्रक पकडला. या ट्रकवर ‘राज्यमंत्री मेघनादीदी साकोरे-बोर्डीकर’ हे नाव ठळक अक्षरात लिहिलेले होते. हा ट्रक राज्यमंत्र्यांच्या नातेवाईकांचा असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनीच ही गोष्ट मान्य केली आहे.
दारुने भरलेला एक ट्रक येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना सापळा रचला. माहूर रोडवरील एका ठिकाणी या ट्रकमधून विदेशी दारुचे बॉक्स खाली उतरवले जात असतानाच पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ट्रक, दारू, सात मोबाइल आणि तीन दुचाकी असा 64 लाख 72 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुण्यातील हडपसर येथून हा ट्रक आल्याची माहिती आहे.
पती आयपीएस अधिकारी, वडील 5 टर्म आमदार अन् आता लेकीलाही मंत्रिपद, कोण आहेत मेघना बोर्डीकर?
या प्रकरणात मेघना बोर्डीकर यांचं नाव चर्चेत आल्याने त्यांनी तातडीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि या प्रकरणाबाबत माहिती दिली. बोर्डीकर म्हणाल्या, हा मुद्दा चर्चेत आला कारण या ट्रकवर माझं नाव होतं. माझ्या पाहु्ण्यांची ती ट्रक आहे. आता त्यांनी पाहुणीच मंत्री आहे म्हटल्यानंतर माझ्या नावाचे स्टीकर ट्रकवर लावले. स्टीकर लावून काही अवैध वाहतूक करावी असा उद्देश मुळीच नव्हता. त्यांचा 2013 पासूनचा हा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे. त्यांना व्हिस्कीचे बॉक्स पुण्याहून नागपूरला घेऊन जाण्याचे भाडे मिळाले होते. या गोष्टी सगळ्या कायदेशीरच होत्या. ट्रकमधील बॉक्सची एक्साइज ड्युटी देखील त्यांनी भरली आहे. करही भरला आहे.
आता ही गाडी चोरीला जात आहे किंवा कुणी बॉक्स चोरतोय अशी माहिती त्यांनी जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीमवर जेव्हा मिळाली त्यावेळी ट्रक पुणे नागपूर रोडने सरळ जाणे अपेक्षित असताना दुसरीकडे का जाते याची शंका आली. त्यानंतर त्यांना शोध घेतल्यानंतर ट्रक ड्रायव्हर आणि त्याचे सात ते आठ साथीदार बॉक्स दुसऱ्या वाहनात घेऊन जात असताना सापडले.
ट्रकचा ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदारांनी सगळं षडयंत्र रचलेलं आहे. माझे पाहुणे (नातेवाईक) ज्यांचा ट्रक आहे ते रात्रीच पुण्याहून पुसदकडे रवाना झाले होते. पाच वाजण्याच्या सुमारास ते पुसद पोलीस स्टेशनला पोहोचले. यात चोरीचा काही विषय नाही. सगळ्या पावत्या आहेत. परंतु, विरोधकांना काहीतरी मु्द्दा पाहिजे असतो. अनेक नेत्यांचे तर देशी दारू लायसनचे दुकाने आहेत. दारुच्या फॅक्टऱ्या आहेत त्यात तुम्हाला काही दिसत नाही.
डोक्यावर 7 कोटींचं कर्ज अन् पाच वर्षात संपत्तीत तीन पटीनं वाढ; मेघना बोर्डीकरांची संपत्ती किती?
यात तो फक्त माझा नातेवाईक आहे. त्याने मला न विचारता माझी परवानगी न घेता गाडीवर माझं नाव टाकलं, ही चूक आहेच. हे मी मान्य करते पण नुसतं नाव टाकलं म्हणून त्याचा कुठे चोरी करण्याचा उद्देश होता का टॅक्स लपवण्याचा उद्देश होता का तर तसं काही नाही. यामध्ये सर्वकाही पारदर्शक आहे. व्हिस्कीचे बॉक्स नागपूरला पोहोचवणे हे त्यांचे नेहमीचे काम आहे.