Loksabha Election 2024 : ‘यवतमाळ-वाशिम’चा बालेकिल्ला उद्धवसेनेकडे जाणार की शिंदेसेनेकडे?

Loksabha Election 2024 : ‘यवतमाळ-वाशिम’चा बालेकिल्ला उद्धवसेनेकडे जाणार की शिंदेसेनेकडे?

Loksabha Election 2024 : शिवसेनेचा अभेद्य गड अशी ओळख असलेल्या वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात (Washim-Yavatmal Lok Sabha) यंदा पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन गट आमने-सामने आले होते. उद्धवसेनेकडून संजय देशमुख (Sanjay Deshmukh) तर शिंदे सेनेकडून राजश्री पाटी (Rajshree Patil) यांच्यात थेट लढत झाली. सध्या ‘डबल हॅट्रिक’वर शिवसेनेचे दोन्ही गट ठाम आहेत. तर देशमुख, पाटील यामध्ये कोण बाजी मारेल? उध्दवसेना, शिंदेसेना यापैकी कोणाच्या हातात मतदारसंघ जाणार? अशा चर्चा मतदारसंघात होत आहे. दरम्यान,  पाटील आणि देशमुख यांच्यातील दुहेरी लढतीत कोण विजयाचा गुलाल उधळणार? हे चार जूनलाच स्पष्ट होणार आहे.

Ahmednagar Loksabha चा गड कोण राखणार, विखे की लंके? काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? 

कॉंग्रेसचा बालेकिल्ला सेनेच्या ताब्यात…
1977 ते 1996 पर्यंत वाशिम लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. 1996 च्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत नेते पुंडलिकराव गवळी यांनी विजय मिळवत काँग्रेसची विजयाची परंपरा पहिल्यांदा खंडीत केली. 1998 मध्ये काँग्रेसने पुन्हा विजय मिळवित बालेकिल्ला परत मिळविला. त्यानंतर 1999 मध्ये झालेल्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या भावना गवळी यांनी विजय मिळवित 2004 पर्यंत शिवसेनेचे वर्चस्व कायम राखले.

लोकसभेच्या निकालानंतर देशपातळीवर मोठी भाकरी फिरणार; उच्च पदासाठी विनोद तावडे चर्चेत 

भावना गवळींचे पंचवीस वर्ष वर्चस्व…
2009 च्या पुनर्रचनेत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून मताधिक्याने विजय मिळवत 2019 पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यावर बालेकिल्ला म्हणून जमा केला. भावना गवळी ह्या स्वतंत्र वाशिम लोकसभा मतदारसंघात दोन वेळा, तर त्यानंतर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात तीन वेळा शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या आहेत.

दरम्यान, जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आणि खासदार गवळी यांनी शिंदेसेने सोबत जाणे पसंत केले. त्यानंतर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाने भावना गवळीऐवजी राजश्री पाटील यांना मैदानात उतरवलं. तर उद्धवसेनेने संजय देशमुख यांना तिकीट दिलं. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत उध्दवसेना व शिंदेसेनेमध्ये झाली.

शत-प्रतिशत विजय आमचाच; दोन्ही गटाचे दावे
मविआतील योग्य समन्वय आणि प्रचाराचे सूक्ष्म नियोजन, नेते-कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, उद्धवसाहेबांप्रती मतदारांची असलेली माया आणि विश्वासार्हता यामुळे संजय देशमुखांचा विजय होणार आहे, असा विश्वास उद्धवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. सुधीर कवर यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तीन दौरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींची सभा, अभिनेता गोविंदांने केलेला रोड शो आणि सहाही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचे प्राबल्य या बळावर विजय आमचाच आहे, असा दावा महायुतीकडून केला जात आहे.

कॉंग्रेसची साथ उद्धवसेनेसाठी पोषक…
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या गत तिन्ही निवडणुकीत एकत्रित शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार रिंगणात होता आणि या दोनच उमेदवारांत लढत झाली होती. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नाही. या मतदारसंघात काँग्रेसकडे हक्काचे अडीच ते तीन लाखांच्या आसपास मतदान आहे. शरद पवार गटही सक्रियपणे निवडणूक प्रचारात उतरला होता, या दोन्हा बाबी संजय देशमुख यांच्यासाठी पोषक आहेत.

महायुतीची ताकद, पण उमेदवार बदलल्याने फटका
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभेत महायुतीचे (चार भाजपा, प्रत्येकी एक शिंदेसेना व अजित पवार गट) आमदार आहेत, ही बाब शिंदेसेनेच्या उमेदवारासाठी जमेची बाजू मानली जात आहे. अजित पवार गटही महायुतीत आहे. शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या विजयाचे गणित हे भाजपा-अजित पवार गटाच्या मदतीवर अवलंबून आहे. शिंदे गटाचे मित्र पक्ष त्यांना निवडणुकीत मदत करतीलच. मात्र, निवडणुकीत ऐनवेळी शिंदेनी उमेदवार बदलल्याने त्यांचा फटका महायुतीला बसू शकतो, असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

गटातटांचा शिंदेसेनेला तोटाच होणार
गत पाच टर्मपासून निवडून आलेल्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांचे समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्ते सुरुवातीला महायुती उमेदवाराच्या प्रचारात दिसले नाही. मात्र, नंतर भावना गवळींनी पाटील यांचा प्रचार केला. मात्र, राजश्री पाटलांचा प्रचार किती ताकदीने केला? हे चार जूननंतरच स्पष्ट होईल. दुसरं असं की, शिवसेनेत उभी फूट पडली आणि गवळी यांनी शिंदेगटात जाणे पसंत केले. मात्र, वाशिम जिल्हा प्रमुखांसह जवळपास 80 टक्के पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य हे मात्र उद्धवसेनेतच राहिले. त्याचा मोठा परिणाम या निवडणुकीत होऊ शकतो.

ठाकरेंना मिळणारी सहानुभूती देशमुखांचं पारडं जड करणार
मविआचे संजय देशमुख यांना मतदारसंघात फिरायला पुरेसा वेळ मिळाला आहे. ते यापूर्वी दिग्रस विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे सध्या मतदारसंघात त्यांचे प्राबल्य आहे. ग्रामीण भागात भाजपच्या शेतीविरोधी धोरणांबद्दल असलेला रोष आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती ही संजय देशमुख यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

भावनाताईंना तिकीट नाकारल्यानं मराठा-कुणबी नाराज
शिंदे यांनी ऐनवेळी भावना गवळी यांची उमेदवारी नाकारून बाहेरील उमेदवार लादला. त्यामुळं भावना गवळींना मानणारा मतदार दुखावला आहे. मागील प्रत्येक निवडणुकीत कुणबी समाज खंबीरपणे खासदार भावना गवळी यांच्या पाठीशी उभा राहिला हा इतिहास आहे. मात्र, यावेळी उमेदवार बदलल्याने कुणबी मतदार राजश्री पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या मतदारसंघात अंदाजे कुणबी मराठा मतदार 5 लाखांपेक्षा अधिक आहे. यावर्गाने मतांद्वारे नाराजी व्यक्त केली तर हा मतदारसंघ शिंदेच्या हातातून सुटण्याची शक्यता अधिक आहे.

दलित-मुस्लिमांची मते मविआच्या पारड्यात…
या मतदारसंघात कुणबी समाजापाठोपाठ बंजारा समाजाची संख्याही मोठी आहे. याशिवाय राळेगावात आदिवासींची संख्या मोठी आहे. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात 13 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. या अटीतडीच्या लढतीत बंजारा, दलित आणि मुस्लिम मतदारांची मते कोणाला मिळतात यावर निकालाचे भवितव्य ठरणार आहे. भाजप आणि शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्वामुळे दलित-मुस्लिम मतदारांची मते शिंदे सेनेला मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

बंजारा समाजाची मतेही ठाकरेंच्या सेनेकडे वळणार…
शिंदे गटाचे नेते संजय राठोड हे या लोकसभा मतदारसंघात सध्या मंत्री आहेत. त्यामुळं बंजारा समाजाची मते शिंदे सेनेच्या बाजूने वळतील, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे बंजारा समाजातील महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केली. त्यामुळं सुनील महाजारांना मानणाऱ्या बंजारा समाजाची मतेही संजय देशमुखांच्या पारड्यात पडतील, असं राजकीय जाणकार सांगतात.

राजश्री पाटलांवर पराभवाचं सावट…
वाशिम-यवतमाळ मतदारसंघात यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद, कारंजा आणि वाशिम या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्याचा फायदा निवडणुकीत राजश्री पाटील यांना होऊ शकतो. शिवाय, राजश्री पाटील यांच्या उमदेवारीमुळे महायुतीने कुणबी विरूद्ध देशमुख असे विभाजन करण्यात यश मिळविले. त्याचाही फायदा राजश्री पाटील यांना मिळू शकतो. मात्र, त्यांचे माहेर यवतमाळ असले तरी त्यांचे वास्तव्य नांदेड येथे आहे. त्यामुळे महायुतीने बाहेरचा उमेदवार लादल्याची हवा विरोधकांनी केली. त्याचा फटका राजश्री पाटलांना बसू शकतो. दुसरं असं की, राजश्री पाटील यांची उमेदवारी ऐनवेळी घोषित झाली. त्यामुळं त्यांना मतदारसंघात फिरण्यासाठी पुरेसा वेळ मिळाली नाही, याचाही त्यांना फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात.

वंचितची मते कोणाला मिळणार?
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चार सभा, पेटून उठलेले शिवसैनिक, मतदारांची सहानुभूती, मित्र पक्षांची भक्कम साथ, निवडणुकीत ‘देशमुख पाटील’ मुद्दा फारसा चालला नाही, त्यामुळं संजय देशमुखांचं पारडं जड असल्याचं राजकीय जाणकार सागंतात. वंचितचे उमेदवार अर्ज छाणनीत बाद झाल्याने ते निवडणूक रिंगणातून बाहेर पडले. वंचितचा उमेदवार नसल्यामुळे मतविभाजनाचा फारसा धोका नसल्याने ही बाब महाविकास आघाडीला पोषक ठरल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. परंतु वंचितचे मतदान आपल्याला मिळावे, यासाठी दोन्ही उमेदवार भर देताना दिसून आहे. वंचितचे मतं कोणत्या गटाने आपल्याकडे वळवली यावरही विजयाचं चित्र अवलंबून आहे.

वाढीव टक्केवारी निर्णायक ठरणार!
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहा विधानसभा मतदारसंघात यंदा 26 हजार 131 नवमतदारांची भर पडून मतदारांची एकूण संख्या 19 लाख 40 हजार 916 वर पोहोचली. त्यापैकी 12 लाख 20 हजार 189 मतदारांनी (62.87%) मतदानाचा हक्क बजावला. 2019च्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत केवळ 1.59नेच वाढ झाल्याचे दिसत आहे. वाशिम 60.56 %, कारंजा 60,98%, राळेगाव 68.96%, यवतमाळ 59.43 %, दिग्रस 66.61 % तर पुसद मध्ये 61.79 % टक्के मतदान झालं. दरम्यान, या वाढलेल्या मतदानाचा फायदा हा आपल्यालाच होणार असल्याचा दावा उद्धव सेनेनं केला. वाढलेलं मतदान हा मोदी सरकारविरोधातील रोष असल्याचं सांगितल्या जातं. तथापि, ही वाढलेली मते सत्ताधारी शिंदे गटाच्या भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देणारी की परिवर्तन घडविणारी ठरणार, हे चार जुनलाच स्पष्ट होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज