विधानसभेला 20 हजार मतदार बाहेरून आणल्याचा आमदार भुमरेंचा दावा; एकनाथ शिंदेंनी केली वेळीच सावरासावर…
विधानसभेला 20 हजार स्थलांतरित मतदारांना बाहेरून आणलं. त्या मतदानाचा मला 100 टक्के फायदा झाला. - विलास भुमरे, आमदार

MLA Vilas Bhumre Statement : राजकीय घोषणांनी आता वातावरण तापले आहे. नुकतंच छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात, विलास भुमरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत 20 हजार मतदार बाहेरून आणले असा धक्कादायक दावा केला. त्यांनी मोकळेपणाने सांगितले की, त्या मतदानाचा मला १०० टक्के फायदा झाला.
20 हजार मतदारांना बाहेरून आणलं
या घटनेमुळे विरोधी पक्षांनी जोरदार आवाज उठवला आहे, आणि राज्यातील राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आहे. विधानसभेला 20 हजार मतदार बाहेरून आणले, असं मोठं विधान विलास भुमरे (Vilas Bhumre) यांनी केलंय. स्थलांतरित 20 हजार मतदारांना बाहेरून आणलं. त्या मतदानाचा मला 100 टक्के फायदा झाला असं भुमरे म्हणालेत. छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. या भाषणादरम्यान विलास भुमरेंना एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मध्येच रोखलं. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे, विरोधकांनी भुमरे अन् एकनाथ शिंदे यांना घेरलं आहे.
आमदार विलास भुमरे नेमकं काय म्हणाले?
दहा जणांना तिकीट मिळणार नाही, सर्वजण त्या पदाचे कॅपेबल असतात. माझ्या मतदारसंघातील 20 हजार मतदार हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्यांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो. आपल्या गावातील, आपल्या मतदारसंघातील (Maharashtra Politics) किती मतदार बाहेरगावी स्थलांतरित झाले आहेत, आपण याची यादी केली पाहिजे. कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20 हजार मतदान हे मी बाहेरून आणलं. मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा झाला, असं विलास भुमरे यांनी मेळाव्यात बोलताना म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, विलास भुमरे यांनी एक लाखाची मदत शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात केली आहे. ही बातमी लावा ना तुम्ही. हे काय करत आहेत? त्यांनी 20 हजार कुठली मतं, याचा खुलासा देखील केला आहे. त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर त्यांची नावं गेली होती. ते मतदार आणले. त्यांनी त्याचा खुलासा देखील केला, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.