Download App

Samruddhi Accident : काम सुरू असतानाच काळाचा घाला! समृद्धीवरील अपघातात नेमकं काय घडलं?

Samruddhi Highway : मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघात चर्चेचे कारण ठरत आहेत. अशात समृद्धी महामार्गावर आणखी एक मोठा अपघात झाला. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे महामार्गाचे काम चालू असताना ब्रीज गर्डरला जॉईन करणारी क्रेन खाली पडल्याने किमान 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

क्रेन कोसळून समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

गर्डर मशीनल जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरून काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचे मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती आहे. तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मशीन खाली किती जण दबले गेले आहेत याची निश्चित माहिती सांगणे सध्या कठीण आहे. बचावकार्य वेगात सुरू आहे.

या ठिकाणी गर्ड बसविण्याचे काम काल रात्री सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक हा अपघात झाला. त्यामुळ कुणाला सावध होण्याचीही संधी मिळाली नाही. पुलाचे गर्डर जोडणारी ही क्रेन साधारण 200 फूट लांबीची आहे. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री दादा भुसे शहापूर तहसीलदार, माजी आमदार पांडुरंग बरोरा घटनास्थळी दाखल झाले.

अपघाताची चौकशी करणार – भुसे

गर्डर मशीनखाली दबले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्राधान्य देत आहोत. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल. तसेच मृतांच्या कुटुंबियांना मदत दिली जाईल, अशी माहिती रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री भुसे यांनी सांगितले.

पीएम मोदींकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. शहापूर दुर्घटनेच्या वृत्ताने अतिशय दुःख झाले. मृतांच्या कुटुंबियांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

Tags

follow us