Nagpur News : राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) सुरू आहे. या दरम्यान राजकीय घडामोडी देखील वेगाने घडू लागल्या आहेत. आताही राज्याच्या राजकारणात चर्चा घडवून आणणारी घडामोड घडली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे (NCP) मनोमीलन घडण्याची चर्चा सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन नेत्यांनी अजित पवार यांची (Ajit Pawar) भेट घेतली. याआधी शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी अजित पवार यांची भेट घेतली.
पवार एकत्र आले तर शिंदेंची गरज संपेल कशी?; अजित पवार-शरद पवार भेटीमागचे नेमके संकेत काय?
नागपुरात राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या निमित्ताने सर्व आमदार नागपुरात आहेत. अजित पवारही आहेत. त्यामुळे विरोधी आणि सत्ताधारी पक्षांतील आमदारांचा भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला आहे. यातच शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आमदार रोहित पाटील आणि सलील देशमुख यांनी अजित पवार यांची भेट घेतली. ही भेट कोणत्या कारणामुळं घेतली याची माहिती मात्र अजून समोर आलेली नाही.
सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढली. मात्र रोहित पाटील यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादी एकसंघ असताना रोहित पवार आणि अजित पवार यांच्यातील जवळीक काहीशी कमी झाली होती.
यानंतर निवडणूक प्रचार काळात अजित पवारांनी फाईलींचा मुद्दा उपस्थित करत आबांवर टीका केली होती. त्यामुळेही दोन्ही कुटुंबात कटुता वाढल्याचं दिसून आलं होतं. परंतु, आता रोहित पाटील यांनी अजितदादांची भेट घेतल्याने हा दुरावा कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवारांचाही प्रतोद, गटनेता ठरला; रोहित पाटील अन् जितेंद्र आव्हाडांवर दिली जबाबदारी
नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात शरद पवार गटाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याऐवजी सलील देशमुख यांना उमेदवारी दिली होती. मात्र सलील देशमुख यांना गड राखता आला नाही. भारतीय जनता पार्टीच्या चरणसिंग ठाकूर यांनी विजय मिळवला. सलील देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला. परंतु, आता मतदारसंघातील कामांचे कारण देत अजित पवार यांची भेट घेतल्याचे सलील देशमुख यांनी माध्यमांना सांगितले. मात्र भेटीचे खरे कारण अजूनही समोर आलेले नाही.