Download App

अमरावती : यशोमती ठाकूरांचा बालेकिल्ला खालसा; एका तपाच्या सत्तेला बच्चू कडूंनी लावला सुरुंग

Bachu Kadu VS Yashomati Thakur : अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या बहुमतातील पॅनेलला धक्का देत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे. बच्चू कडू यांची अध्यक्षपदी तर अपक्ष संचालक अभिजित ढेपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पूर्ण बहुमत आणि सर्व परिस्थिती काँग्रेससाठी अनुकूल असतानाही काँग्रेसचा हा पराभव यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसची 3 मत फुटली आहेत.

अमरावती जिल्हा बँकेवर दीड वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलला 13 जागा मिळाल्या होत्या. तर बच्चू कडू यांच्या परिवर्तन पॅनेलला 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर 3 अपक्ष निवडून आले होते. त्यावेळी सुधाकर भारसाकळे यांना अध्यक्षपद तर सुरेश साबळे यांना उपाध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र ही निवड दीड वर्षांसाठीच करण्यात आली होती. आता दीड वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने या भारसाकळे आणि साबळे यांनी राजीनामा दिला. यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली होती.

यानंतर काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप तर उपाध्यपदासाठी ठाकूर यांचे समर्थक हरिभाऊ मोहोड यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. मात्र आज सकाळी अचानक या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. आमदार बच्चू कडू यांनी आज सकाळी अध्यक्षपदासाठी तर अभिजित ढेपे यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. बच्चू कडू यांच्याकडे बहुमत नव्हते. परिवर्तन पॅनेल आणि अपक्ष पॅनेल मिळून 8 मत होतं होती. यामुळे बच्चू कडू यांनी नेमकी कोणती रणनीती डोक्यात ठेवून अध्यक्षपदासाठी अर्ज भरला असा प्रश्न विचारला जाऊ लागला. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसची तीन मत फुटल्याचं स्पष्ट झालं. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बच्चू कडू आणि अभिजित ढेपे निवडून आले.

अजित पवारांची मध्यस्थी?

दरम्यान, या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांना अजित पवार यांची मदत झाल्याची चर्चा आहे. काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते. सध्या ते अजित पवार यांच्या गटात आहेत. अजित पवार, संजय खोडके आणि बच्चू कडू यांनी एकत्र येत यशोमती ठाकूर यांचा बालेकिल्ला खालसा केल्याची चर्चा आहे. गत मागील 10 वर्ष आणि आताची दीड वर्ष अशी सलग साडे अकरा वर्षांपासून बँकेत यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसचा हा बालेकिल्ला खालसा करण्यासाठी गत निवडणुकीत संजय खोडके यांनी बच्चू कडू यांना साथ दिली होती. मात्र मात्र त्यात फारसे यश आले नव्हते. आता संधी मिळताच संजय खोडके यांनी यशोमती ठाकूर यांना धक्का दिल्याच्या चर्चा आहेत.

Tags

follow us