Download App

विधानभवनातला ‘पास घोटाळा’! 5 ते 10 हजारांमध्ये प्रवेश, आमदारांनी रेट कार्ड आणि ठिकाणही सांगितलं

Vidhan Bhavan Entry Pass Scam : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांमध्ये थेट विधानसभा लॉबीत वाद झाला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या संसदीय परंपरांवर आणि राजकीय शिष्टाचारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेपर्यंत पोहोचले असून, पास विक्रीच्या (Vidhan Bhavan Entry Pass Scam) प्रकारावरून नवा वाद पेटला आहे.

विधानभवनात पास विक्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात गंभीर आरोप करत सांगितले की, विधानभवन प्रवेशासाठी 5 ते 10 हजार रुपये देऊन पास विकले जात आहेत. इतकी गर्दी होते की (Vidhan Bhavan Entry Pass) महिला आमदार सना मलिक यांनीही तक्रार केली की, गर्दीतून वाट काढणे कठीण होते. परब यांनी याप्रकरणी धक्कादायक माहिती देताना सांगितले की, मुंबईतील आयनॉक्स थिएटरजवळ पैसे देऊन पास मिळतात. कुठे किती पैसे द्यायचे हेही ठरलेलं असतं. काही जण तर एफिडेव्हिटवर नावे लिहून द्यायची तयारी दर्शवतात, अशी देखील धक्कादायक माहिती परब यांनी दिली.

विधानसभा हल्ला प्रकरण: आम्हाला आरोपी ठरवलं, गुन्हेगार मोकाट ; जितेंद्र आव्हाडांचा संताप

मंत्र्यांना पास नाही, पण कार्यकर्ता आत?

शशिकांत शिंदे यांनी आणखी एक किस्सा सांगितला की, एका मंत्र्यांना पास मिळाला नाही, पण त्याच्याच कार्यकर्त्याला सभागृहात प्रवेश मिळाला. मंत्री जेव्हा त्या कार्यकर्त्याला विचारले, तू कसा आत आलास? तेव्हा तो म्हणाला, ‘कसं आलो ते सांगू नका, पण आत आलो आहे’. या घटनेबाबत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मकोका लावलेले गुन्हेगार सभागृहात येत आहेत, मारामाऱ्या होत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

पोलीसच आरोपीला तंबाखू मळून देत आहेत

एक आमदार म्हणतो की अमुक व्यक्तीला मार, आणि दुसऱ्या बाजूने एका व्यक्तीला अटक केली जाते, पण ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई होत नाही. पोलीस एखाद्या आरोपीला तंबाखू मळून देत असल्याचं चित्र दिसतं, ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, असेही दानवे म्हणाले. विधानसभेत काल घडलेल्या गोंधळानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन करायचाही अधिकार आता काढून घेतला जाणार का? जितेंद्र आव्हाड यांना जीव मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, आणि पोलीस मात्र तंबाखू देण्यात गुंतले आहेत. काय हे सरकार आणि काय पोलीस? असे सवाल देखील शशिकांत शिंदे यांनी केलाय.

कठोर निर्णयांची मागणी
विधानसभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी सांगितले की, घटना अतिशय गंभीर असून, योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली की, विधानसभा अध्यक्ष आज अहवाल मांडणार होते, पण जयंत पाटील यांच्या विनंतीनंतर तो थोड्या वेळासाठी स्थगित करण्यात आला आहे. सभागृहात कलम 289 अन्वये झालेल्या चर्चेनंतर आजच निर्णय जाहीर केला जाईल, असेही राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

follow us