Vijay Shivtare : मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे कालपासून अनेक आमदारांनी अधिवेशन सोडून आपापल्या मतदारसंघाचा रस्ता धरला होता. अशातच कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोक बोलणारे (Vijay Shivtare) शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनीही मंत्रिपदावरुन तिखट भाषेत नाराजी बोलून दाखवली आहे.
जहाँ नही चैना वहाँ नहीं… 8 दिवसांपूर्वीच्या मोठ्या ऑफरचा उल्लेख करत भुजबळांचे बंडाचे संकेत?
सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर नागपूर येथील विधिमंडळातून बाहेर पडताना विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी विजय शिवतारे यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे तुम्हीदेखील नाराज आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर विजय शिवतारे यांनी म्हटले की, मंत्रीपद मिळाले नाही, याचं काही वाटत नाही. पण त्यापेक्षा आम्हाला मिळालेल्या वागणुकीचं वाईट वाटतं.
तिन्ही नेते साधे भेटायला तयार नाहीत. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी 100 टक्के आहे. आता अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी मी घेणार नाही. मला मंत्रिपदाची गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करुन घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. मंत्रिपदाबाबत मला राग नाही. पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे.
यामध्ये कोणाचं नाव घ्यायची गरज नाही. पण एक सौजन्य असायला हवे. आम्ही कार्यकर्ते म्हणजे कोणी गुलाम नाहीत ना? नाराजीचं कारण हे आहे, की अशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. ज्याप्रकारे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. तिन्ही नेत्यांकडून चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, ते सौजन्य सुद्धा त्यांनी दाखवलं नाही . ज्या प्रकारे महायुतीमध्ये असताना विरोधात उमेदवार उभे केले गेले. याबद्दल तिन्ही नेत्यांपैकी कोणीही कोणाला बोलत नाही. मंत्रीपद महत्त्वाचे नव्हते. पण माझी जी कपॅसिटी राज्याच्या विकासासाठी वापरायची गरज होती, ती आता वापरली जाणार नाही असंही ते म्हणालेत.