मुंबई : महायुती सरकार राज्यातील गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहेरबानीने हे गुंड राजरोस फिरत आहेत. जामिनावर सुटलेला गुंड निलेश घायवाळ मुख्यमंत्र्यांना भेटतो. मंत्रालयात बिनधास्त फिरतो. मंत्रालयात रिल्स बनवतो. सामान्य माणूस मात्र रांगेत उभा असतो. यालाच म्हणायचे का अच्छे दिन असा, सवाल करत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी गुंडांना राजाश्रय मिळत असल्याचा आरोप करत शिंदे सरकारवर (Shinde Government) तोफ डागली. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांची गुंड मारणेची भेट घेतली. या भेटीवरुन पार्थ यांच्यावर त्यांच्याच पक्षातून टीका झाली. स्वतः अजित पवार यांनी देखील ही भेट चुकीची असल्याचे सांगितले. अशातच उल्हासनगरमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. (Vijay Wadettiwar criticized the Shinde government, alleging that gangsters are getting royal treatment)
याच घटनेनंतर विरोधकांकडून सरकार गुंडांना राजाश्रय देत असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. अशात शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसादिनी भेट घेतल्याचा फोटो ट्विट केला होता. शिवसेनेकडूनही लगेच कारवाईचे पाऊल उचलत ही भेट घडवून आणणाऱ्या अनिकेत जावळकरची युवा सेनेतून हकालपट्टी केली.
त्यानंतर आज राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुख्यात टोळी प्रमुख निलेश घायवळ याने भेट घेतल्याचा फोटो ट्विट केला. यातून त्यांनी पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त शिंदे पिता-पुत्राकडून मिळतो का?, असा सवाल करत घणाघात केला. यावरच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, जामिनावर सुटलेला गुंड निलेश घायवाळ मुख्यमंत्र्यांना भेटतो. मंत्रालयात बिनधास्त फिरतो. मंत्रालयात रिल्स बनवतो. सामान्य माणूस मात्र रांगेत उभा असतो. यालाच म्हणायचे का अच्छे दिन? रोज एक नवा गुंड सरकारच्या भेटीला येत असून सरकारमधील मंत्र्यांना, काही मंत्र्यांच्या मुलांना याचे काहीच वाटत नाही. म्हणजे सरकार गुंडांना अभय देत असून या सरकारच्या काळात गुंडाराज सुरू असल्याचे स्पष्ट आहे. गुंड मंत्रालयात बिनधास्त फिरतायत आणि सामान्य जनता मात्र बाहेर रांगेत उभा असते. याची सरकारला लाज देखील वाटत नाही.