Download App

गुजरातचा अधिकारी, महाराष्ट्रात 640 एकर जमीन खरेदी; संतापलेल्या वडेट्टीवारांनी सरकारला फोडला घाम

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे. यावेळी विजय वडेट्टीवार आक्रमक मूडमध्ये होते. त्यांनी या जमीन खरेदीच्या मुद्द्याला हात घालत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.

Vijay Vadettiwar: राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) आज विधिमंडळात चांगलेच आक्रमक झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर नजीकचं झाडाणी गाव. या गावात गुजरातच्या एका जीएसटी आयुक्तानं अगदी कवडीमोल भावात तब्बल 640 एकर जमीन खरेदी केली. खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले असे गंभीर आरोप करत आता सरकार यावर काय कारवाई करणार, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

राज्य विधिमंडळाच्या (State Legislature) पावसाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे. यावेळी विजय वडेट्टीवार आक्रमक मूडमध्ये होते. त्यांनी या जमीन खरेदीच्या मुद्द्याला हात घालत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. अॅम्ब्यूलन्स घोटाळ्याचा उल्लेख करत सरकारला जाब विचारला. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सध्या मस्ती आणि दादागिरी सुरू आहे. झाडाणी गावात गुजरातच्या जीएसटी (GST) आयुक्ताने अल्पदरात 640 एकर जमीन खरेदी केली. खरेदी करताना खरेदीच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. निश्चित मर्यादेपेक्षा जास्त जमीन खरेदी केली. नंतर येथे खोदकाम करण्यात आले यासाठी महसूल विभागाची कोणतीही परवानगी घेतली गेली नाही.

संबंधित गावातील लोकांनी तक्रारी केल्या तरी त्यांची दखल घेतली जात नाही अशा पद्धतीने येथे मनमानी कारभार केला जात आहे. आम्ही पत्र पाठवले तर काहीतरी थातुरमातूर उत्तरे दिली जातात. येथील पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा विषय संवेदनशील आहे. या भागातील वन्यप्राण्यांचाही कुणाकडून विचार केला जात नाही, अशी खरमरीत टीका वडेट्टीवार यांनी केली.

वनजमिनीतून काढण्यात आलेल्या रस्त्यामुळे वन कायद्याचे उल्लंघन झाले. कोणतीही परवानगी न घेता डोंगरातून रस्ते काढण्यात आले. याबाबत संबंधित अधिकाऱ्याला फक्त एक नोटीस बजावण्यात आली. गुजरातचे जीएसटी आयुक्त आणि त्यांचे कुटुंबीय सुनावणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहिले. पण येथील अपर जिल्हाधिकारी महसूल मंत्र्यांबरोबर मंत्रालयातील बैठकीसाठी मुंबईला गेले. त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणी आता 11 जुलै रोजी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय

मूळचे महाराष्ट्रातील नंदुरबारचे रहिवासी असलेले आणि सध्या गुजरातमधील अहमदाबाद येथे मुख्य जीएसटी आयुक्त असलेल्या चंद्रकांत वळवी (Chandrakant Valvi) यांनी ही जमीन खरेदी केल्याची तक्रार आहे. चंद्रकांत वळवी, त्यांचे नातेवाईक अशा सुमारे 13 जणांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथे संपूर्ण गाव खरेदी केलं. त्यामुळे तेथील 620 एकर जमीन त्यांच्या ताब्यात गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे तांब हे गावही महाबळेश्वर तालुक्यातच आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावापासून वळवी यांनी खरेदी केलेली जमीन 30 किलोमीटर आहे. आता तिथं बांधकामांनाही सुरूवात झाली असून त्यामुळं पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986, वन (संवर्धन) कायदा, 1976 आणि वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कायद्यांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

follow us