जब भी मैं घायल होता हूँ, तब मैं…; विवेक कोल्हेंचा राहात्यातील सोहळ्यातून विखेंना अप्रत्यक्ष इशारा

‘जब भी मैं घायल होता हूँ, तब मैं घातक होता हूँ,’ हे विरोधकांनी लक्षात ठेवावं, अशा शब्दांत कोल्हे यांनी विरोधकांना थेट संदेश दिला.

Untitled Design 112

Untitled Design 112

Vivek Kolhe’s indirect warning to Vikhe : अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपमधील कोल्हे-विखे संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला असून, विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर आमदार विवेक कोल्हे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या राहता तालुक्यात पार पडला आणि याच मंचावरून विखे विरोधकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं.

भाजपचे नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांच्या सत्कारासाठी केवळ भाजपमधील विखे विरोधकच नव्हे, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच मनसेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या विशेष महत्वाचा मानला जात आहे. कार्यक्रमादरम्यान अनेक वक्त्यांनी नाव न घेता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रभावती घोगरे यांनी तर विवेक कोल्हे यांच्या आमदारकीमुळे आम्हाला ऑक्सिजन मिळाला असं वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवलं.

मी काँग्रेसची पदाधिकारी असले तरी कोल्हे यांच्या सत्कारासाठी आले आहे. पक्ष तुमचा असला तरी माणूस आमचा आहे,” असं म्हणत त्यांनी विखे पाटलांना अप्रत्यक्ष टोला लगावला. दरम्यान, आमदार विवेक कोल्हे यांनी देखील आपल्या भाषणातून थेट इशारा देत गणेश कारखाना कर्जप्रकरणावरून विखे पाटलांवर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. तीन वर्षांनी कारखान्याच्या निवडणूक होतील, तेव्हा लोकशाही मार्गाने सभासदांपर्यंत जा. मात्र कर्ज प्रकरणात अडथळे आणून शेतकऱ्यांची कामधेनू अडचणीत आणू नका, असा इशारा त्यांनी दिला.

‘tukaram_ias’ इंस्टाग्राम अकाउंटवर पाठवा माहिती; भेसळखोरांवर होणार थेट कारवाई

आमचं कुणाशी बांधावरून भांडण नाही. पण संस्थेच्या हितासाठी रस्त्यावर उतरायलाही आम्ही तयार आहोत. ‘जब भी मैं घायल होता हूँ, तब मैं घातक होता हूँ,’ हे विरोधकांनी लक्षात ठेवावं, अशा शब्दांत कोल्हे यांनी विरोधकांना थेट संदेश दिला. तसंच, मुख्यमंत्र्यांनी आमदारकीचा बिल्ला माझ्या छातीवर लावला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. आता माझं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि त्यात राहाता-लोणीचाही समावेश होतो, असं सांगत त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली.

त्याचवेळी जनतेच्या कामांसाठी गरज पडल्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जाण्याची तयारी असल्याचं सांगतानाच, जाणीवपूर्वक कुणाला अडचणीत टाकलं जात असेल तर मी एक भाऊ म्हणून कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, असंही कोल्हे यांनी स्पष्ट केलं. विधानपरिषदेवरील निवडीनंतर विवेक कोल्हे यांचं वाढतं राजकीय वजन आणि त्याला मिळत असलेला सर्वपक्षीय पाठिंबा पाहता, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हे-विखे संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

Exit mobile version