नगरपालिका-नगरपंचायत मतदानाची वेळ संपली; कुठं उमेदवाराची वेळ चुकली तर कुठ राडा

मतदानाची वेळ संपली तरी देखील राज्यातील अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. तर अनेक ठिकाणी राडा झाल्याचंही दिसून आलं.

News Photo   2025 12 02T184106.934

News Photo 2025 12 02T184106.934

राज्यात आज नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 262 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान झालं. सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात झाली होती. (Election) सांयकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ होती. मतदानाची वेळ संपली तरी देखील राज्यातील अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. तर अनेक ठिकाणी राडा झाल्याचंही दिसून आलं. आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबरच्या निकालाकडं लागलं आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं.

मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार ज्योती भालेराव यांना स्वतःच मतदानाचा हक्क बजावता आला नाही. संध्याकाळी ठरलेल्या साडेपाच वाजेच्या वेळेनंतर त्या मतदानासाठी केंद्रावर आल्या. मात्र, वेळ संपल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. फक्त उमेदवारच नव्हे तर त्यांच्या बुथवरील कार्यकर्त्यालाही मतदान करता आलं नाही, तसंच उशिरा पोहोचलेल्या काही मतदारांचीही मतदानाची संधी हुकली.

लोकसभेत SIR वरून गदारोळ; NDA कडून चर्चा टाळण्याचा प्रयत्न, सभागृह दोनवेळा तहकूब

उमेदवार स्वतः वेळेत मतदान केंद्रावर पोहोचू न शकल्याने स्थानिक पातळीवर आश्चर्य आणि चर्चांना उधाण आले आहे. महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नवे नगर परिसरात तणाव उसळला. दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आले आणि तुफान हाणामारी झाली. प्राथमिक माहितीनुसार, सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली. जाबरे समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

ही बाचाबाची सुरु असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती आहे. त्यानंतर विकास गोगावले हेच रिव्हॉल्वर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा ताफा तैनात केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मनमाडमध्ये नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक वाद पेटला.

प्रभाग क्रमांक 11 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवाराने आरोप केल्यानंतर दोन्ही गट भिडले. पाहता पाहता ढकलाढकली आणि धक्काबुक्की सुरू झाली. या गोंधळात भाजपचे उपाध्यक्षही धक्काबुक्कीला सामोरे गेले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मतदारांची पळापळ झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना वेगळे केले आणि मतदान केंद्र परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.

येवल्यातील सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थकांमध्ये झालेल्या वादातूनही राडा उसळला. मतदान केंद्रात ये-जा करण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगवले. मतदान केंद्राबाहेर सतत तणाव निर्माण होत असल्याने पोलिस कर्मचारी सतत तैनात ठेवण्यात आले आहेत.

सटाणा नगरपरिषद निवडणुकीदरम्यान जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळील मतदान केंद्र क्रमांक 10 जवळ अन्य कारणातून अचानक दोन गटांमध्ये राडा झाला. घरगुती वादातून सुरू झालेला हा वाद मतदान केंद्राजवळ घडल्याने नागरिकांमध्ये धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने मोठा फौजफाटा आणून परिस्थिती नियंत्रणात आणली. राड्यातील काही सहभागी थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्याचं समजतं.

मतदान केंद्राजवळील एका उमेदवाराचा बूथ पोलिसांनी हटवून कायदा व सुव्यवस्थेसाठी कडक बंदोबस्त उभा केला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये नूतन विद्यालय मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून पोलिस आणि उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाली. वाद चिघळू लागल्याने मतदान केंद्राबाहेर तणाव पसरला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल करण्यात आली.

Exit mobile version