Download App

महाराष्ट्रात 14 जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती चिंताजनक; जालना, सांगली, साताऱ्याला सर्वाधिक फटका

पुणे : महाराष्ट्रातील जुन आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील किमान 14 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. या 14 पैकी जालना, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (14 districts record high rainfall deficiency; Jalna, Satara, and Sangli most vulnerable)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 जिल्ह्यांमध्ये पावसाची लक्षणीय कमतरता आहे. यात मराठवाड्यातील सर्वाधिक सात जिल्हे आहेत. तर मध्य महाराष्ट्रातील चार आणि विदर्भातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत; शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काय करावं? पवारांनी सांगितली पंचसुत्री

14 जिल्ह्यांपैकी, जालना जिल्ह्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दरवर्षी किमान 408.3 मिमी पाऊस पडतो. पण यंदा आतापर्यंत 291.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत हे प्रमाण 46 टक्क्यांनी कमी आहे. जालनानंतर सांगलीत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. सांगलीत यंदा सरासरीच्या 44 टक्के कमी पाऊस पडला आहे. तर साताऱ्यात सरासरीच्या 36 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 20 ते 25 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनीही महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे आणि त्यापैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची लक्षणीय कमतरता आहे, असेही ते म्हणाले.

‘कृषीमंत्री असताना तुम्ही किती मदत केली?’ महाजनांनी पवारांकडे मागितला हिशोब

नांदेड, पालघर आणि ठाण्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस :

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली असतानाच, नांदेड, पालघर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. नांदेडमध्ये 28 टक्के जास्त पाऊस पडत आहे, तर पालघर आणि ठाणे येथे अनुक्रमे 23% आणि 26% जास्त पाऊस पडत आहे. जुलैमधील सक्रिय मान्सूनच्या स्थितीमुळे या तीन जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला, असे हवामान विभागाने सांगितले.

पालघर आणि ठाण्याला मान्सूनच्या अरबी समुद्रातील वातावरणाचा फायदा झाला तर नांदेडला बंगालच्या उपसागरातील वातावरणाचा फायदा झाला. परिणामी, सक्रिय मान्सूनच्या परिस्थितीत या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. तर कोकण आणि गोवा उपविभाग जुलैमधील अतिवृष्टी श्रेणीतून या महिन्यात सामान्य पावसाच्या श्रेणीत गेला आहे.

Tags

follow us