सर्व रस्ते मीच करणार, तुम्ही चिंता करू नका; मी कामाचा माणूस, फक्त भाषण करणारा नाही -आशुतोष काळे

रांजणगाव देशमुख येथे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समितीच्या आवाराचे भूमिपूजन काळे यांच्या हस्ते करण्यात आलं.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 04T193247.196

झगडे फाटा ते तळेगाव या रस्त्याबरोबरच साईबाबा कॉर्नर ते वैजापूर, शिंगणापूर रेल्वे चौकी ते संवत्सर, कोळपेवाडी कोपरगावला जोडणारा एम.डी.आर.८५ व एम.डी.आर.०८ अशा जवळपास ५४ किलोमीटर रस्त्यांचा विकास होणार आहे. (Kale) हे रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे प्रयत्न सुरु असून या रस्त्यांना लवकरच मंजुरी पण मिळणार आहे. हे सर्व रस्ते मीच करणार आहे, तुम्ही चिंता करू नका. मी कामाचा माणूस आहे, फक्त भाषण करणारा नाही अशी कोपरखळी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील रांजणगाव देशमुख येथे उपबाजार समितीचे भूमिपूजन प्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांना लगावली.

रांजणगाव देशमुख येथे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समितीच्या आवाराचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नितीन औताडे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, सहाय्यक निबंधक संदिपकुमार रुद्राक्ष, सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे, सर्व संचालक, पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.

कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त तीन दिवस कर्मवीर कृषी महोत्सव अन् शेतकरी मेळावा

पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, रांजणगाव देशमुख उपबाजार समितीचा कार्यभार चार एकर जागेत चालवितांना अडचणी येवू नये व सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सोळा एकर मधील जास्तीत जास्त जागा उपबाजार समितीला देवू कारण रांजणगाव देशमुखच्या सरपंच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आहेत. झगडे फाटा ते तळेगाव दिघे या १७ किलोमीटर रस्त्याचा शिर्डीचा बाह्यवळण रस्ता म्हणून नियमितपणे उपयोग करण्यात येत असल्यामुळे राज्यमार्ग नियमाप्रमाणे करण्यात आलेला हा रस्ता काही प्रमाणात टिकला आहे. मात्र ज्या ठिकाणी भक्कम पाया नाही त्या ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या १७ किलोमीटर रस्त्यासाठी पहिल्या टप्यात राज्य शासनाकडून १० कोटी निधी मिळविला होता. त्या निधीतून झगडे फाटा ते जवळके पर्यंत पहिल्या टप्यात साडे आठ किलोमीटर रस्त्याचं काम झालं आहे. त्यापैकी ज्या ठिकाणी भक्कम पाया नाही त्या ठिकाणी दोन किलोमीटर अतिशय खराब असलेल्या रस्त्याची तीन वेळा दुरुस्ती या रस्त्याच्या ठेकेदाराकडून करून घेतली आहे.

ज्याप्रमाणे मा.आ.अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात पुणतांबा फाटा ते झगडे फाटा हा सहा किलोमीटरचा रस्ता सहा ते सात फुट खोदून तयार केला त्याप्रमाणे या रस्त्याचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे उच्च दर्जाचे अंदाजपत्रक तयार करून हा रस्ता करण्याचा माझा प्रयत्न असून वेगेवेगळ्या योजनेतून या रस्त्याला निधी मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे सुरु असून त्यामध्ये हा रस्ता सुचविला असून त्याचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे सादर केला आहे. सी.आर.एफ.मधून हा रस्ता व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांची भेट घेवून ह्या रस्त्याला निधी मिळण्याबाबत त्यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यामुळे विविध योजनेतून लवकरच या सर्व रस्त्यांना मंजुरी मिळणार आहे.

निळवंडे कालव्यांचे काम पूर्ण झाले असून कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. चारी डी वाय तीनचे काम सुरु आहे चारचे डिझाईन काम अंतिम झाले असून मंजुरी येताच ते काम लवकरच सुरु होईल. अंजनापुर, बहादरपूर पश्चिम भागातील बंधारे भरण्यासाठी खोकड विहिरीपर्यंत तसेच धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील बंधारे भरण्यासाठी अंजनापूर चेक पर्यंत आवश्यक असलेल्या पूर चारीचे सर्वेक्षण व प्रोजेक्ट रिपोर्टचे काम सुरु असून लवकरच ते मार्गी लागणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

विकासकामांच्या माझ्या पाठपुराव्याबाबत वेळोवेळी मी जनतेला सांगत असतो.त्यापैकी एखाद्या विकासकामांना निधी मिळाल्यावर तो निधी आम्हीच मिळविला असे सगळेच सांगतात आणि फ्लेक्स लावून मोकळे होतात. मा.आ.अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे केली पण गाजावाजा केला नाही. त्याप्रमाणे जाहिरातबाजी करणे, फ्लेक्स लावणे माझे काम नाही मात्र मी पाठपुरावा करून निधी मिळवायचा आणि ज्यांचा काडीचा संबंध नाही ते फ्लेक्स लावतात त्यामुळे मला फ्लेक्स लावावे लागतात असंही आशुतोष काळे म्हणाले आहेत.

follow us