कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटकात झालेल्या विचारवंतांच्या हत्येमुळे सारा देश हादरला होता. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंताच्या हत्या झाल्या होत्या. यातील ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील १० आरोपींवर दोष निश्चिती करण्यात आली आहे.
कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयासमोर सोमवारी ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे. गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर १२ संशयितांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यातील १० आरोपींना अटक करण्यात आली होती. दोघे फरारी आहेत. त्यामध्ये विनय पवार व सारंग अकोलकर यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील समीर गायकवाड व वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह दहा संशयित आरोपीवर आज दोष निश्चिती करण्यात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
यातील सहा संशयित बंगळुरू कारागृहात तर तीन येरवडा कारागृहात आहेत. विशेष सरकारी वकील म्हणून शिवाजीराव राणे हे काम पाहत आहेत. दोष निश्चिती झाल्यामुळे आता सुनावणीला वेग येण्याची शक्यता आहे. गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये हत्या करण्यात आली होती.