सांगली करुया चांगली… असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतून संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीच्या जनतेनेही जवळपास 52 वर्षे काँग्रेसकडे असलेला गड भाजपच्या ताब्यात दिला. संजयकाकांनी तब्बल अडीच लाख मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला. 2019 मध्येही पुन्हा पक्षांतर्गत विरोध असतानाही संजयकाकांवर विश्वास दाखवला. उमेदवारीची माळ त्यांच्याच गळ्यात टाकली. त्यांनीही कसोशीने प्रयत्न करुन विजय दीड लाख मतांनी पुन्हा दिल्ली गाठली. (Anger within the BJP against MP Sanjay Patil has increased the tension among the senior leaders of the party.)
आताही पुन्हा भाजपने संजयकाकांनाच ग्रीन सिग्नल दिला आहे. पण यंदा मात्र संजयकाकांविरोधातील भाजपमधीलच नाराजांनी पक्षश्रेष्ठींचे टेन्शन वाढविले आहे. सगळ्यांचाच विरोध असतानाही संजयकाकांना उमेदवारी देणे कोणत्या शास्त्रात बसते असा जाहीर सवाल माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे. तर त्याचवेळी सांगली मतदारसंघात तयारी सुरु केलेल्या माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याही भूमिकेकडे लक्ष लागले आहे. आता या सगळ्या नाराजांची समजूत काढण्याची जबाबदारी सांगली लोकसभा प्रमुख शेतकरी इनामदार आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर देण्यात आली आहे.
2014 च्या निवडणुकीत विलास जगताप यांनी राष्ट्रवादीत असूनही संजयकाका पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीही जगताप यांनी संजयकाकांचे काम केले. पण आता मात्र जगताप यांनी संजयकाकांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. याचे कारण 2019 मधील विधानसभेच्या निवडणुका. 2019 मध्ये विधानसभेला संजयकाका पाटील यांनीच आपल्याला इच्छा नसतानाही जबरदस्तीने उभे केले आणि पाडण्याचे षडयंत्र रचले असा आरोप केला. तिथपासून जगताप आणि पाटील यांच्यात बिनसले.
केवळ मीच नव्हे तर दुष्काळ फोरम निगडित सर्वच भाजपमधील नेते खासदार संजय पाटील यांच्यावर नाराज आहेत आणि कोणीही त्यांच्या उमेदवारीला संमती दर्शवणार नाही, असा दावा जगताप करु लागले. जगताप यांच्या मदतीला यंदा पृथ्वीराज देशमुख यांनीही मैदानात उडी घेतली होती. देशमुख यांनी तर थेट उमेदवारीचीच मागणी करत तयारी सुरु केली. गाठीभेटी, मेळावे घेऊ लागले. संजयकाका पाटील यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांशी असलेली जवळीकही अनेकांना चांगलीच खटकू लागली होती. या सगळ्यातूनच त्यांच्या उमेदवारीबाबात शंका उपस्थित केली जात होती.
मागच्या साडेनऊ वर्षांत खासदारांकडून पक्षासाठी कोणतेही योगदान मिळत नसल्याचा आरोप पक्षातील नेत्यांनीच करायला सुरुवात केली होती. जिल्ह्यात सांगली आणि मिरज हे दोन मतदारसंघातील आमदारांनी आपल्या आपल्या बळावर विजय मिळविले. अन्य ठिकाणी संजयकाका पाटील यांनी लक्षच घातले नव्हते, त्यामुळे जिल्ह्यातील अन्य सहापैकी एकाही विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला विजय मिळविता आला नव्हता, असाही आरोप जिल्ह्यातील नेत्यांनी करायला सुरुवात केली होती. त्यातही संजयकाका पाटील आणि जयंत पाटील यांच्या मैत्रीच्या खुमासदार चर्चाही जिल्ह्यात अनेकदा ऐकायला मिळायच्या.
पण या सगळ्यानंतरही भाजपमधील अंतर्गत विरोध डावलून दिल्लीतून खासदार संजय पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. ही उमेदवारी देताना पक्षांतर्गत सगळे वाद संपले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण जगताप यांच्या उघड भूमिकेनंतर तो फोल होता असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 2019 प्रमाणेच पुन्हा एकदा नाराज नेत्यांची समजूत काढण्याचे आव्हान नेत्यांसमोर उभे टाकले आहे. यात आता नेते यशस्वी होणार का? की नाराजीमध्ये संजयकाकांचा राजकीय बळी जाणार हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.