Kolhapur Riots :
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या फकीरवाडा भागात संदल उरोसदरम्यान औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्यानंतर आज मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. यामुळे पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. या तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (A tense atmosphere in Kolhapur due to Aurangzeb’s status, stone pelting by Hindutva organizations and lathi charge by the police)
राज्यभरात शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह असतानाच कोल्हापूर मात्र तणावपूर्ण परिस्थितीतून जात होते. याच कारण ठरलं ते शिवराज्याभिषेक दिनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवणे. हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या आवारात ठाण मांडलं. संतप्त कार्यकर्ते पोलिस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून बसले असल्याची बातमी शहरात पसरताच अन्य संघटनांचे कार्यकर्त्यांनी तिथे गर्दी केली होती. प्रक्षुब्ध जमावाने सदर बाजार येथील संबंधित तरुणाच्या घरावर चाल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तरुण घरी नसल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा फौजफाटा वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला.
त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास हिंदुत्ववादी संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर आंदोलनाला सुरुवात केली. औरंगजेबाच्या समर्थनाचे स्टेटस ठेवणार्या तरुणाला तातडीने अटक करा, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. जोरदार घोषणाबाजी करत संबंधित स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांचा निषेध करण्यात आला. मात्र पोलिसांकडून कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. जमावाने लक्ष्मीपुरी बाजार, सीपीआर चौकासह परिसर आणि दसरा चौकात प्रार्थनास्थळांवरही दगडफेक केली. दुकाने, स्टॉल, हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली.
तरुणांच्या एका गटाने टाऊन हॉल परिसरातील प्रार्थनास्थळाकडे धाव घेऊन प्रार्थनास्थळावर दगडफेक केली. या दरम्यान, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी दसरा चौकात लाठीमार करुन जमाव पांगवला. सायंकाळी संतप्त आणि आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. समाजकंटकांना अटक केल्याशिवाय कोणी उठायचे नाही, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला. यानंतरच काल संध्याकाळी हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली.
कोल्हापूर बंदची हाक दिलेली असतानाच आज सकाळपासूनच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि तरुण लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात जमण्यास सुरुवात झाली. 10 च्या सुमारास हजारो कार्यकर्ते आणि युवक जमा झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली. यानंतर काही संतप्त कार्यकर्त्यांनी शहरभरातील विविध प्रार्थनास्थळ, शनिवार पेठ, पोस्ट ऑफिसचा भाग, सीपीआर, दसरा चौक अशा ठिकाणी जमा झाले.
या दरम्यान संतप्त जमावाकडून काही हिंसक प्रतिक्रिया देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जमावातील काही तरुणांनी परिसरातील दुकाने बंद पाडली. तसंच लक्ष्मीपुरी आणि परिसरातील हातगाड्या उलटविल्या, काही दुकानांवर दगडफेक झाली. जमाव दुकाने बंद करण्याची मागणी करत या परिसरातून फिरत होता. त्यामुळे काही काळ दुकाने बंद राहिली. यावेळी चिमासाहेब चौकातील काही हातगाड्यांवरील साहित्य संतप्त जमावाने फेकून दिले. त्यानंतर टाऊन हॉलमागील एका चिकन सेंटरची तोडफोड केली. संतप्त जमावाला रोखण्याचा प्रयत्न पोलिस करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला.
दरम्यान, या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई आणि सर्वच पोलीस अधिकारी काठी घेऊन रस्त्यावर उतरले होते. सध्या संपूर्ण शहरात पोलिसांची मोठी कुमक तैनात असून तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. राज्य सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. मी वैयक्तिकरित्या संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा हातात घेणाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही शासनाची जबाबदारी असल्याने सर्व नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची गृह विभाग काळजी घेत असून गृहराज्यमंत्रीही त्यावर लक्ष ठेवून आहेत, असं शिंदे म्हणाले.
कोल्हापुरातील या प्रकाराविषयी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही. जनतेने शांतता राखावी. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच कुणी चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आणि तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आण्याचे, निर्देशही गृहविभागाने कोल्हापूर पोलिसांना दिले आहेत. यासोबत खबरदारी म्हणून इतर जिल्ह्यांवरही बारीक नजर ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि तणावाच्या परिस्थितीमुळे कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात अफवांचं पेव फुटू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, असं पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं.