Kolhapur Internet Services back : कोल्हापुरातील दगडफेकीच्या घटना आणि येथे निर्माण झालेला जबरदस्त तणाव कमी करण्याच्या उद्देशान प्रशासनाने तब्बल 42 तास जिल्ह्यातील इंटरनेट ठप्प केले. या निर्णयामुळे तणाव निवळण्यास मोठी मदत झाली. शहरातील दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, या निर्णयाचा फटका आर्थिक उलाढालीला बसल्याचे समोर आले आहे. इंटरनेट बंद असल्याने सगळेच व्यवहार ठप्प झाले होते. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कंपन्यांनाही याची झळ बसली. या 42 तासांच्या काळात तब्बल 1 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.
कोल्हापुरात काही युवकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चाही काढला होता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी बुधवारी सायंकाळनंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 40 तासांपेक्षा जास्त काळ इंटरनेट बंद राहिल्याने जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा फटका बसला.
आज सगळीकडेच ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. काही जरी खरेदी करायला गेले तर लोक पैसे देण्यासाठी ऑनलाइन पद्धतींचा जास्त वापर करतात. पण, शहरात इंटरनेट बंद असल्याने हे व्यवहार होऊ शकले नाहीत. जिल्ह्यात वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करणारे जवळपास वीस हजार कर्मचारी आहेत. इंटरनेट नसल्याने त्यांना काहीच काम करता आले नाही. पर्यायाने कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी आता कर्मचाऱ्यांना शुक्रवारी काम करण्यास सांगितले आहे.
इंटरनेट नसल्याचा मोठा फटका उद्योगांना बसला. यामुळे 1 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा दावा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने केला आहे. कोल्हापुरातील इंटरनेट शुक्रवारी पूर्ववत करण्यात आले.
बावनकुळे हे तुम्हाला पटतं का?; अजितदादांनी सुनावले