Download App

माढ्याचं पाणी, ऊसदर अन् 20 लाख कोटींची खरेदी; पवारांवर हल्लाबोल करत मोदींनी हिशोबच मांडला

महाराष्ट्राची जनता प्रेम आणि आशीर्वादात कोणतीच कसर सोडत नाही. पण जो वचन पूर्ण करत नाही त्याचा हिशोबही चुकता करते.

PM Narendra Modi Speech : महाराष्ट्राची जनता प्रेम आणि आशीर्वादात कोणतीच कसर सोडत नाही. पण जो वचन पूर्ण करत नाही त्याचा हिशोबही चुकता करते. मागील 15 वर्षांपूर्वी एक नेते येथे आले होते. येथील दुष्काळी भागात पोहोचविण्याची शपथ त्यांनी मावळत्या सूर्याच्या साक्षीनं घेतली होती. पण, त्यांनी पोहोचवलं का असा सवाल उपस्थित करत त्यांना आता निवडणुकीत शिक्षा देण्याची वेळ आली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत केली.  तसेच मोदी सरकारच्या काळात मागील दहा वर्षात काय कामं झाली याचा हिशोबच मोदींनी या सभेत दिली.

माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथील सभेत पीएम मोदींनी शरद पवार आणि काँग्रेसवर घणाघाती टीका केली. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रणजित निंबाळकर, नीलम गोऱ्हे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आदींसह महायुतीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मोदींनी सुरुवातीलाच मागितली माफी

मोदींनी नेहमीप्रमाणे भाषणाची सुरुवात मराठीतून केली. पण यावेळी मोदींचा लूक काही वेगळाच होता. खांद्यावर घोंगडी आणि डोईवर पिवळा फेटा बांधत मोदी भाषणाला उभे राहिले. यावेळी त्यांनी सुरुवातीलाच लोकांची माफी मागितले. मोदी म्हणाले, आपल्या इथल्या राजकारणी लोकांना वेळेत यायची सवय नाही. सभा अकरा वाजताची असेल तर नेते थेट एक वाजता येतात. लोकांच्याही हे अंगवळणी पडलं आहे. पण, मी वेळेचा पक्का आहे. त्यामुळे मी आल्यानंतरही लोक येतच आहेत. आता मला उशिरा येणाऱ्यांचं दर्शन घेता येणार नाही. त्यांनाही माझे विचार ऐकता येणार नाहीत. त्यामुळे मी तुमची माफी मागतो.

मोदींनी माढ्यात विजयाचा डाव टाकला! धनगरी पोशाख, माफी अन् येळकोट-येळकोटचा जयघोष

मोदी पुढे म्हणाले,  विदर्भ, मराठवाडा पाण्यासाठी तरसवण्याचे काम वर्षानुवर्षे पाप होतेय. काँग्रेसला 60 वर्षे संधी दिली पण यांनी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी सुद्धा पोहोचवलं नाही. किती मोठा धोका या लोकांनी महाराष्ट्राला दिला याचा विचार करा. 2014 मध्ये ज्यावेळी आमचं सरकार सत्तेत आलं तेव्हा काँग्रेस सरकारच्या काळात लटकून राहिलेल्या 100 सिंचन योजनांपैकी 60 योजना पूर्ण झाल्या. आमच्या सरकारने पाच वर्षाच 11 कोटी लोकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं कामही केलं.

दहा वर्ष कृषीमंत्री पण, शेतकऱ्यांसाठी काही नाही

आघाडीवाले गप्पा मारतात. यांच्या सरकारच्या काळात काय स्थिती होती आठवा जरा. म्हणून आज मी सत्य सांगण्यासाठी येथे आलोय. दहा वर्ष रिमोट कंट्रोल सरकार होते. येथले मातब्बर नेते (शरद पवार) कृषीमंत्री होते . त्यावेळी उसाचा एफआरपी 200 रुपये होता. आज आमच्या सरकारच्या काळात 340 रुपये प्रति क्विंटल दर आहे. त्या काळात शेतकरी साखर कार्यालयात खेटा मारत होते. आज एरियल पेमेंट शंभर टक्के होत आहे.

दिल्ली सरकारमध्ये ते होते. त्यावेळी फक्त साडेसात लाख कोटींचा शेतमालाची खरेदी केली होती. आज आम्ही मात्र 20 लाख कोटींच्या शेतमालाची खरेदी केली. दिल्लीतून शेतकऱ्यांचे पैसे आले तर काँग्रेसचा पंजा हा पैसा लुटायचा. पण आज दिल्लीत तुमचा मुलगा बसलाय. तीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पोहोचले. यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, असे मोदी म्हणाले.

शिंदेंचं ठरलं! उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर

मागील दहा वर्षांच्या काळात 70 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना अतिरिक्त मिळाले. शेतकऱ्यांना सौरऊर्जा दाता बनवण्याचे काम सरकार करत आहे. आता प्रत्येक घरातील वीजबिल शून्यावर आणण्याचं उद्दीष्ट पीएम सूर्यघर योजनेत हाती घेतलं आहे, ये होता है मोदी की गॅरंटी का मतलब.. असेही मोदी यावेळी जोरकसपणे म्हणाले.

काँग्रेसच्या एक्स रे मशीनपासन सावध राहा

काँग्रेसचे शहजादे म्हणतात संधी मिळाली तर एक्स रे काढू. तुमच्या घरातील संपत्तीचा हिशोब केला जाईल आणि ही जास्तीची संपत्ती नंतर वाटून टाकली जाईल. आणखी एक टॅक्सचा उल्लेख ते करतात. तुम्ही जी बचत करता त्यावर फक्त मुलांचाच नाही तर सरकारचाही हक्क राहिल. त्यातील निम्मी संपत्ती सरकार घेणार. मला सांगा तुम्हाला असे सरकार पाहिजे का? संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला पाहिजे का? असा सवाल उपस्थितांना करत या लोकांतून एकही माणूस जिंकून दिल्लीत जायला नको, असे मोदी म्हणाले.

follow us