Download App

पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर आमदार रोहित पवार; विधिमंडळाकडून नियुक्ती

  • Written By: Last Updated:

पुणे : सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांची राज्य विधानमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अधिसभेवर नियुक्ती केली. विधीमंडळ सचिवालयाने नुकतेच आमदार पवार यांना नियुक्ती पत्र दिले आहे. त्यांच्या नियुक्तीचे विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे.

याआधी रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी देखील निवड झाली आहे. त्यापाठोपाठ आता पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांची नियुक्ती झाली आहे. रोहित पवार यांच्या निवडीमुळे सलग दुसऱ्यांदा पवार घराण्यातील प्रतिनिधी विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर काम करणार आहे. याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून काम केले होते.

रोहित पवार यांनी शासनाकडे वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला. एमपीएससीची परीक्षा बहुपर्यायी न होता युपीएससीच्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. परंतु, हा निर्णय लगेच लागू न करता 2025 पासून लागू करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी होती. या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावरही उतरले होते. विद्यार्थ्यांच्या या मागणीसाठी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची बाजू मांडली दरम्यान सरकारने विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेतला होता. याशिवाय, पुण्यात विश्रांतवाडी येथील बांधकाम पूर्ण झालेले शासकीय वसतीगृह तातडीने सुरु करण्याचा विषयावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अडचणी दूर करण्याच्या विषयावरही त्यांनी आवाज उठवला आहे.

Dattatray Bharne-Harshwardhan Patil यांच्या मतदारसंघातील नागरिकांना पुण्यातील पोटनिवडणुकीबद्दल काय वाटतं?

विविध पद भरती परिक्षेतील गोंधळ, पदवी आणि संबंधित अभ्यासक्रमाच्या तारखा, पदभरती, परिक्षा रद्द होणे, त्यातील चुकीच्या अटी, गोंधळ अशा अनेक विषयांवर पवार यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे. आता सरकारने त्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती केल्याने विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचीही सिनेटवर नियुक्ती झाली.

Tags

follow us