Download App

विशाळगड अतिक्रमणाबाबत आमदारांनी राजकारण करू नये, अन्यथा… संभाजीराजे यांचा इशारा

  • Written By: Last Updated:

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय झालेला असताना देखील स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत ? असा खडा सवाल विचारत आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी आमदार विनय कोरे यांना दिला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या सोशल मीडियावरून आज एक पोस्ट शेअर करत हा इशारा दिला आहे. आपल्या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे की दीड महिन्यापूर्वी समस्त शिवभक्त व दुर्गप्रेमी मंडळींच्या सोबत किल्ले विशाळगडची पाहणी करून जिल्हा प्रशासनासोबत विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत विशाळगडाचे अतिक्रमित रहिवासी, दुर्गप्रेमी संस्था, संबंधित प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रण होते.

मात्र लोकप्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरविली होती. छत्रपती संभाजीराजे यांच्यासह कोल्हापूर जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्व बाजू ऐकून घेऊन अंतिमत: विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटविण्याचा एकमुखी निर्णय झालेला होता. तसेच महाशिवरात्री पूर्वी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई पूर्ण केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

या पार्श्वभूमीवर विशाळगड अतिक्रमण बाबत शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी काल जिल्हा प्रशासनासोबत परस्पर बैठक बोलाविली असल्याचे शिवप्रेमींच्या निदर्शनास आले. या बैठकीस विशाळगडाच्या अतिक्रमित रहिवाशांना निमंत्रण होते, मात्र कोणत्याही दुर्गप्रेमी संस्थेस याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आलेली नव्हती. यावर शिवभक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन मोठा रोष निर्माण करताच आमदार कोरे या बैठकीस आलेच नाहीत व बैठक रद्द झाली.

यावर छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय झालेला असताना देखील स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत ? असा खडा सवाल विचारत आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दिलेला आहे.

आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणे पाठीशी घातल्यानेच विशाळगडाची ही विषन्न अवस्था झालेली आहे. अजूनही गडावर चालू असलेल्या करवाईवर दबाव आणून ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता शिवभक्त जागा झाला आहे, तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही, असा कडक इशारा देत आमदारांच्या या गुपचूप बैठकीचा राजकीय डाव उधळणाऱ्या दुर्गप्रेमी शिवभक्तांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. प्रशासनाने आश्वासन दिल्यानुसार महाशिवरात्रीच्या आधी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटविलीच पाहिजेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

Tags

follow us