कोल्हापूर : इचलकरंजीला सुळकूड योजनेतून पाणी न देण्याचा एकमुखी निर्धार दूधगंगा बचाव कृती समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. तसंच इथल्या जनतेने हट्ट सोडावा, सुळकूड पाणी योजना रद्द न झाल्यास रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिला. आज (रविवारी) कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात दूधगंगा बचाव कृती समितीची सर्वपक्षीय व्यापक बैठक संपन्न झाली यावेळी मुश्रीफ बोलत होते. (People’s representatives from Kagal along with Hasan Mushrif have shown opposition to providing water to Ichalkaranji through the Sulkood scheme)
या बैठकीला कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाडगे, आमदार प्रकाश अबिटकर, कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, उल्हास पाटील, प्रवीण सिंह पाटील, वीरेंद्र मंडलिक, अमरीशसिंह घाटगे, युवराज पाटील यांच्यासह सहा तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीला सुळकूड योजनेतून पाणी न देण्याचा एकमुखी निर्धार दूधगंगा बचाव कृती समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. दुधगंगेतून इचलकरंजीला पाणी देण्याऐवजी पर्याय उपलब्ध आहे. मजरेवाडीतून त्यांना पाणी देण्यासाठी निधी मंजूर झाला आहे, मग सुळकूड योजनेतूनच पाणी का? असं म्हणत इचलकरंजीकरांनी हट्ट सोडावा अन्यथा रक्तपात होईल असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.
औद्योगिक शहर असलेल्या इचलकरंजीला तीन-चार दिवसात पाणीपुरवठा होत असतो. यावर उपाय म्हणून कागल तालुक्यातील सुळकुड येथील दूधगंगा नदीतून पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित कोट्यातून इचलकरंजीला पाणी द्यावे असा प्रस्ताव शासनाच्या जलसंपदा विभागाने दिला होता. त्यानंतर तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने 18 जून 2020 रोजी सुळकूड योजनेस मंजुरी दिली. महाविकास आघाडी सरकारमध्येच उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी योजनेचा ऑनलाइन शुभारंभही केला होता. गतवर्षी खासदार धैर्यशिल माने यांच्या प्रयत्नातून या योजनेच्या 161 कोटींच्या प्रशासकीय खर्चालाही मान्यता मिळाली.
मात्र शेतीला पाणी कमी पडते असा मुद्दा मांडून दूधगंगा-वेदगंगा काठावरच्या कागल आणि आजूबाजूच्या भागातील जनता आणि लोकप्रतिनिधिंनी सुळकूड योजनेतून पाणी देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. इचलकरंजीला सुळकूड योजनेतून पाणी मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे म्हणत मुश्रीफ यांनी ठामपणे विरोध दर्शवला आहे. त्यांच्या जोडीला आजवरचे कट्टर विरोधक समरजीतसिंह घाटगेही एकवटले आहेत. त्यांना खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार के. पी. पाटील यांचेही समर्थन मिळाले आहे.