अहमदनगर : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर (Ahmednagar) जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. अधून-मधून जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरते, त्यानंतर पुन्हा हा मुद्दा थंड बस्त्यात पडतो. मात्र, आता खुद्द राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी जिल्हा विभाजनाविषयी (Ahmednagar District Division) मोठं वक्तव्य केलं आहे. जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचं खुद्द मंत्री विखे यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शिर्डीला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केले होते. त्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुकतेच मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार सदाभाऊ लोखंडे, आमदार आशुतोष काळे हे देखील उपस्थित होते. यावेळी लोखंडे आणि काळे यांनी यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी केली. या मागणीच्या पार्श्वभूमीवर विखे यांनी जिल्हा विभाजनाबाबत मोठं भाष्य केले आहे. महसूलमंत्र्यांनी शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचं सांगितलं आहे.
मराठवाड्यासाठी खोलली राज्याची तिजोरी; शिंदे सरकारकडून 59 हजार कोटींचे पॅकेज जाहीर
नगर जिल्ह्यासाठी नवीन अप्पर जिल्हाधिकारी हे पद मंजुरी करण्यात आले आहे. तसेच याचे शिर्डीत कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात विखे पाटलांनी जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी हे नवीन जिल्ह्याचे मुख्यालय करण्याचा डाव आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नगर जिल्ह्याबाबत यापूर्वीच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात हे सरकार जिल्हा विभाजनासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतेय. यातच विखेंनी जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचं सांगितलं. त्यामुळे येत्या काळात नवीन जिल्ह्याचे मुख्यालय शिर्डीलाच होईल की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळं जिल्हा विभाजनाची मागणी
प्रशासकीय बाबींसाठी जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन विभाग करण्यात आलेत. उत्तरेकडील तालुके समृद्ध आहेत. साखर कारखाने, दूध उत्पादन, शैक्षणिक संस्था आणि इतर बाबींमुळं उत्तर भागातील लोकांचे जीवनमान उंचावले आहे. तर दक्षिणेकडील तालुके बहुतांशी दुष्काळी म्हणून ओळखले जातात. परिणामी त्यांचे प्रश्नही वेगळे आहेत. नगर हे शहर दक्षिणेकडील तालुक्यांचे मुख्यालय आहे, तर ते उत्तरेला अकोले, संगमनेर, कोपरगाव तालुक्यांसाठी दूरचे आहे. त्यांना किरकोळ कामासाठी नगरला येणं जिकरीचं होतं. त्यामुळं जिल्हा विभाजनाची मागणी दक्षिणेतील नागरिकांकडून केली जाते.