Download App

‘भाजप आमदाराला रोखा’; रोहित पवारांची टोलेबाजी करत अजितदादांकडे विनवणी

Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार गटांत जोरदार धुमश्चक्री सुरु झाली आहे. नूकताच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा कोल्हापुरात शेतकरी मेळावा पार पडला. त्यानंतर आता हैद्राबादचे भाजपचे आमदार टी राजा (T. Raja) यांना कोल्हापुरातील एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. टी राजा हे प्रक्षोभक भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कोल्हापुराती वातावरण दुषित न होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काका अजित पवार यांच्याकडे साकडं घातलं आहे. टी राजा यांच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी खुद्द रोहित पवारांनी केली आहे. यासंदर्भातील एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

आमदार रोहित पवार पोस्टमध्ये म्हणाले, दादा, आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात. आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापुरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती असल्याचं पवार म्हणाले आहेत.

तसेच मा. अजितदादा, आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकारशक्ती असल्याने अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही, असंही ते म्हणाले आहेत.

नितीश कुमारांच्या बिहारी पॉलिटिक्सचे ‘इंडिया’ला धक्के; महाराष्ट्र-पंजाबात काँग्रेसचं गणित बिघडणार?

याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आलंय. हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापुरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये, अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे. स्वतःचं अपयश लपविण्यासाठी सत्ता असूनही सामान्यांच्या हिताला प्राधान्य न देता भाजपकडून केवळ महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची विचारधारा पुसण्याचं काम केलं जात असल्याने आपण पुरोगामी विचारधारेचे पाईक व उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालाल ही अपेक्षा! असल्याचंही रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, नूकतीच अजित पवार यांनी शेतकरी मेळावा घेतला. त्यानंतर आता भाजपचे आमदार टी राजा यांना कोल्हापुरात आमंत्रित करण्यात आलं आहे. आता रोहित पवार पोस्टद्वारे अजित पवार यांनी विनवणी केली आहे. त्यावर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

follow us