कोल्हापूर : “वातावरण तापले आहे, त्यामुळे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र किती जागा लढवणार, मी कुठून निवडणूक लढवणार याबाबत अद्यापचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र एकच सांगतो, आम्ही जुन्या जखमा अजून विसरलेलो नाही” असे आव्हान देत संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे जणू संपूर्ण चित्रच स्पष्ट केले. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Sambhaji Raje Chhatrapati talk on the upcoming 2024 Lok Sabha elections.)
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, लोकसभेचे वातावरण तापायला लागले आहे. त्यामुळेच आपण मला प्रश्न विचारत आहात. पण सध्या तरी वेट अँड वॉच आहे. अद्याप किती जागा लढवणार याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र स्वराज्य मुख्य प्रवाहात राहणारच. हा माझा शब्द आहे. आमच्यावर 2009 मध्ये झालेल्या जुन्या जखमा अजूनही विसरलेलो नाही.
मी त्या प्रसंगाला वार म्हणणार नाही. कारण आमच्यावर कोणीही वार करु शकत नाही. मात्र वेळप्रसंगी तुम्हाला सर्वांना दिसेल. स्वराज्यबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. दरम्यान, ते स्वतः कुठून निवडणूक लढवणार याबाबत विचारले असता ते म्हणाले, कोल्हापूर, नाशिक की संभाजीनगर हा निर्णय सुद्धा वेळ ठरवेल. जे कोणी जास्त प्रेम देतील तिथून आपण उभे राहणार. मात्र त्यापूर्वी चर्चेचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचेही संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. उदयसिंह गायकवाड यांनी काँग्रेसच्या तिकीटावर इथून तब्बल पाचवेळा विजय साकारला. 1999 नंतर सदाशिवराव मंडलिकांमुळे काँग्रेसचा बालेकिल्ला राष्ट्रवादीकडे सरकला. पण 2009 मध्ये “आता बैल म्हातारा झाला आहे, नवीन खोंड निवडा.” असं म्हणत शरद पवार यांनी मंडलिकांना डावलून संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी दिली.
त्यावेळी युती धर्माचे पालन करत काँग्रेसचे तत्कालिन नेते सतेज पाटील यांनी संभाजीराजे आणि राष्ट्रवादीचे काम केले. मात्र सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष अर्ज भरला आणि निवडून आले. त्यावेळी राष्ट्रवादीतील काहींनी मंडलिकांना छुपी मदत केली होती, असा आरोप झाला. पण त्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झाले. 2016 मध्ये केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले.