अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. संगमनेरातून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन मोटारसायकलची समोरुन येणाऱ्या दुधाच्या टँकरला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन युवक ठार झाले आहे. तर या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Sangamner Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण हे संगमनेर तालुक्यातील चिखली या गावाचे रहिवासी आहेत. भीषण अपघातात झालेल्या त्यांच्या निधनानं संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. हा अपघात मंगळापूर शिवारातील बर्फ कारखान्याजवळ घडला. संगननेरातून चिखलीच्या दिशेने आपल्या घराकडे निघालेले चौघे तरुण मोटारसायकल वरून गप्पा मारत चालले होते. यावेळी मंगळापूर शिवारातील बर्फ कारखान्याजवळ अकोल्याकडून आलेल्या एका दुधाच्या टॅंकरला या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात दोन दुचाकीवरील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण अत्यवस्थ झाला. या वाहानांच्या धडकेने झालेला प्रचंड आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली.
Sachin Tendulkar : वनडे मालिका बोरिंग होत चालल्यात; सचिनने सांगितली भन्नाट आयडिया
यावेळी काहींनी संगमनेर शहर पोलिसांनाही अपघाताची माहिती दिल्याने शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. नागरिक आणि पोलिसांनी चौघाही तरुणांना रुग्णालयात दाखल केले होते, मात्र त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मयत झालेले तिनही तरुण हे संगमनेर शहरापासून अवघ्या सहा किलाोमीटर अंतरावर असलेल्या चिखली या गावचे रहिवासी आहेत. मयत झालेल्या तरुणांची नावे ऋषिकेश उमाजी हासे (वय 20), सुयोग बाळासाहेब हासे (वय 20) निलेश बाळासाहेब सिनारे (वय 26, तिघेही या. चिखली, ता. संगमनेर) अशी आहेत. जखमी झालेल्या 32 वर्षीय तरुणाचं नावं संदीप भाऊसाहेब केरे आहे.
दरम्यान, मयतांचे मृतदेह पालिकेच्या शवविच्छदेन गृहात पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर शहर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून दुध टॅंकर चालकालाही अटक केली असू पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.