Download App

विश्वजीत-विशालची सरशी : जयंत पाटलांच्या हातातून सांगली निसटली?

सांगलीमधून विशाल पाटील यांनी अपक्ष बाजी मारली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांना उघड मदत केली

सांगलीचे वाघ आम्हीच आहोत… दीड महिन्यापूर्वी सांगलीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा झाली होती. त्यात विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी ठाकरेंसह उपस्थितांना ही गोष्ट ठणकावून सांगितली होती. कट टू 4 जून 2024. सांगलीमधून (Sangli) विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष बाजी मारली. त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उघड मदत केली. काँग्रेसच्या विक्रम सावंत, विश्वजीत कदम या आमदारांनी छुपी रसद पुरविली. पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील हे नेतेही विशाल पाटलांच्या मागे ठाम उभे राहिले. थोडक्यात काय तर विशाल पाटलांसाठी सांगलीची काँग्रेस एकवटली. ठाकरेंसमोर जे ठणकावून सांगितले होते ते बोल विश्वजीत कदमांनी खरे करुन दाखवले. तब्बल 10 वर्षांनी पुन्हा सांगली काँग्रेसकडे आली. (Vishal Patil won as an independent from Sangli. Congress workers and office bearers openly helped him)

पण फक्त सांगली काँग्रेसकडे आली एवढाच या निकालाचा अर्थ आहे का? तर निश्चितच नाही. आगामी काळात सांगलीचे नेतृत्व कोण करणार? फैसला करणारी ही निवडणूक ठरली, असे म्हंटल्यास वावगे ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्यातील राजकीय नेतृत्वाची देखील ही लढाई होती. जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपावेळी धारण केलेले मौन हे खूप काही बोलून गेले. त्याचवेळी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आमदार कदम यांनी दिल्लीपर्यंत केलेली पायपीट, विशाल कदम यांना निवडून आणण्यासाठी केलेली कसरत पाहता जिल्ह्यातील नेतृत्व स्पर्धा या पुढील काळात अधिक तीव्रपणे पुढे येण्याची चिन्हे आहेत. याची झलक तोंडावर आलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहण्यास मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

Modi 3.0 : मोदी सरकारची पहिलीच अग्नीपरीक्षा; 24 जूनपासून संसदेचे विशेष अधिवेशन

आघाडी सरकार असताना एकट्या सांगली जिल्ह्यातून पतंगराव कदम, जयंत पाटील, आर. आर. पाटील, मदन पाटील असे चार मंत्री असायचे. यातही पतंगराव कदम वरचढ ठरायचे. पालकमंत्री पद बाळगून असायचे. पण हळू हळू परिस्थिती बदलली. 2009 ला मदन पाटलांचा पराभव झाला. 2014 मध्ये संजयकाका पाटलांनी संधी साधत राष्ट्रवादी सोडली. भाजपमध्ये प्रवेश केला. जयंत पाटलांच्या मैत्री त्यांना फायद्याची ठरली. प्रतिक पाटील यांचा पराभव करुन संजयकाका पाटील खासदार झाले. सगळ्या कुरघोड्यांना वैतागून प्रतिक पाटलांनी सक्रिय राजकारणच सोडलं. पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांचे निधन झाले. जिल्ह्यात काँग्रेसची पिछेहाट होऊ लागली. वसंतदादा पाटील, पतंगराव कदम यांचे घराणे जिल्ह्यात नावापुरतेच राहिले. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने 2019 मध्ये लोकसभेची जागाही सुटली.

सहाजिकच जिल्ह्यातील सत्तेचा लोलक जयंत पाटलांकडे सरकला. सांगलीचे पालकमंत्रीपदीह जयंत पाटलांकडेच आले. सांगली जयंत पाटलांचा बालेकिल्ला झाला. पण 2024 मध्ये समीकरणे बदलली. विशाल पाटील यांना घेऊन कदम यांनी गेल्या दोन वर्षापासून लोकसभेची तयारी केली. परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने मतदार संघही ढवळून काढला. असे असताना अखेरच्या क्षणी सांगली शिवसेनेला आंदण देण्यात आला. सलग दुसऱ्यांदा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटल्याने पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला. इथेच सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी उसळी मारली. कोल्हापूरच्या बदली सांगली ही सबब न पटणारी होती. जिल्ह्यात शिवसेनेचा साधा ग्रामपंचायत सदस्यही नसताना सांगली ठाकरेंना गेलीच कशी? हा प्रश्न विचारला जाऊ लागला. इथे जयंत पाटील शांत राहिले. मग काय, यामागे नेमके कोणाचे राजकारण आहे, हे काँग्रेसच्या नेत्यांनी ओळखले.

चंद्राबाबू चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री; आज शपथविधी होणार, पंतप्रधान मोदींची उपस्थिती

यातून या राजकीय खेळीमागे जिल्ह्यातील जुना बापू-दादा वाद असल्याच्या समजाला खतपाणी मिळत गेले. आमदार पाटील यांच्याकडे संशयाची सुई गेली. त्यांनी किमान पाच वेळा यामध्ये माझा कोणताच सहभाग नसल्याचे सांगत हा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील प्रश्न असल्याचे सांगत स्वत:ला या वादातून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर अजूनही जिल्ह्यातील एकाही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला विश्वास बसलेला नाही. अखेरीस विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांनी दबाव झुगारुन बंडखोरीचा निर्णय घेतला. विशाल पाटलांना कदमांनी छुपी रसद पुरवली. जयंत पाटलांच्या कथित कुरघोड्यांना काँग्रेस आणि विशाल पाटील पुरुन उरले. सांगलीची जागा, विशाल पाटील राज्यात गाजले. आता विशाल पाटील विजयी झाल्याने विश्वजीत कदमांचे यशस्वी नेतृत्व पुढे आले.

आता जिल्ह्यात काँग्रेसचा खासदार, काँग्रेसचे दोन आमदार, विश्वजीत कदमांचे नेतृत्व अशा सगळ्या गोष्टी एकत्र घडून आल्या आहेत. त्यामुळेच आगामी काळात जिल्ह्याचे नेतृत्व कोणता नेता करणार? विश्वजीत कदमांचे सरशीने जयंत पाटलांच्या हातातून सांगली जिल्हा निसटला आहे का? असे प्रश्न विचारले जात आहेत.

follow us

वेब स्टोरीज