Download App

पश्चिम महाराष्ट्रात मविआने युतीला पाणीच पाजलं! सोलापूर, सांगली, अन् कोल्हापुरात दे धक्का…

लोकसभेच्या निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला पाणीच पाजलं असल्याचं स्पष्ट झालं. सोलापूर, सांगली, कोल्हापुरात महायुतीला दे धक्का मिळालायं.

Image Credit: Letsupp

Loksabha Election Result : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election Result) निकाल आता जवळपास स्पष्ट झालायं. राज्यातील अनेक भागांत महायुतीला फटका तर काही मतदारसंघात मुसंडी मारल्याची परिस्थिती आहे. महाविकास आघाडीनेही (MVA) यंदा कमालीची रणनीती आखत महायुतीला (BJP) चीत करण्यात यश मिळवलंय. पश्चिम महाराष्ट्रातही काहीशी अशीच परिस्थिती दिसून येत असून शिरुर, बारामती, सोलापुर, माढा, कोल्हापुरात महाविकास आघाडीने बाजी मारलीयं. तर पुणे, मावळ, सातारा आणि हातकणंगलेचा गड भाजपने कायम राखून ठेवलायं. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीच वरचढ ठरल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Beed Loksabha : पंकजा मुंडे पराभवाच्या छायेत… उदयनराजे भोसले राजीनामा देणार का?

बारामती, शिरुरमध्ये महाविकास आघाडीचा वरचष्मा :
शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाल्याचं दिसून आलंय. मागील निवडणुकीत बारामती आणि शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विरोधकांवर मात केली होती. यंदासुद्धा शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना चीतपट केलंय. अमोल कोल्हे यांनी 1 लाख 36 हजार 744 मतांची आघाडी घेत विजय मिळवलायं. तर शिवाजीराव आढळऱाव पाटलांना एकूण 6 लाख 79 हजार 934 मते मिळाली आहेत. अमोल कोल्हे यांना एकूण 6 लाख 79 हजार 934 मते मिळाली आहेत. तर बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना 6 लाख 34 हजार 336 मते मिळाली आहेत. तर महायुतीच्या सुनेत्रा पवार यांना 5 लाख 7 हजार 889 मताधिक्य मिळालंय. सुप्रिया सुळे यांना 1 लाख 26 हजार 447 मतांचा लीड मिळालायं.

पुणे अन् मावळ मतदारसंघ महायुतीने राखला :
पुणे मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. याच मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 1 लाख 18 हजार मतांनी विजयी झाले आहेत. मोहोळ यांना एकूण 5 लाख 49 हजार 21 मते मिळाली असून रविंद्र धंगेकरांना 4 लाख 36 हजार 379 मताधिक्य मिळालंय. तसेच वंचितचे वसंत मोरे यांच्या पदरात अवघे 30 हजार 914 मते पडली आहेत. तर मावळ मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झालायं. बारणे यांना एकूण 6 लाख 92 हजार 832 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना एकूण 5 लाख 96 हजार 217 मते मिळाली आहेत. बारणे यांनी गड राखत 96 हजार 615 मतांच्या लीडने विजय मिळवलायं.

सोलापुरात ‘कमळ’ डावलून ‘तुतारी’, पंजाला पसंती…
अवघ्या महाराष्ट्राचं सोलापुरच्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. सोलापुर मतदारसंघात भाजपने राम सातपुते यांना संधी दिली तर महाविकास आघाडीकडून प्रणित शिंदेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. प्रचारादरम्यान, दोन्ही उमेदवारांमध्ये वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून आलं. प्रचारानंतर पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये प्रणित शिंदे यांनी यांना 23 व्या फेरीअखेर 5 लाख 92 हजार 180 मते मिळाली तर राम सातपुते यांना 5 लाख 11 हजार 31 मते मिळाली. प्रणिती शिंदे यांनी मतमोजणीच्या अखेरच्या फेरीत 81 हजार 149 च्या लीडने विजयी झाल्या आहेत. तसेच माढ्यामध्ये भाजप गड राखणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, मात्र, अखेरच्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी 1 लाख 19 हजार 265 मतांचा लीड घेत चर्चेला पूर्णविराम दिला. मोहित पाटलांना एकूण 6 लाख 18 हजार 310 मते मिळाली तर रणजितसिंह निंबाळकर यांना एकूण 4 लाख 99 हजार 45 मते मिळालीत.

Uttar Pradesh Loksabha : अयोध्येत भाजपला राम ‘पावला’ नाही, समाजवादीची सायकल ‘सुसाट’…

सांगलीत ‘मशाल’ नाही तर ‘विशाल’च :
सांगली लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना धूळ चारुन सांगलीचे आम्हीच किंग असल्याचं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. सांगलीत लोकसभा मतदारसंघात विशाल पाटलांनी मोठं मताधिक्य घेत अखेर विजय खेचून आणलायं. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना 4 लाख 29 हजार 947 मते मिळाली असून महायुतीचे उमेदवार 3 लाख 50 हजार 300 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार 49 हजार 254 मते मिळाली आहेत. दरम्यान, विशाल पाटील यांनी 79 हजार 647 मतांनी विजय खेचून आणलायं.

कोल्हापुरकरांचं छत्रपतींच्या गादीलाच मत…
छत्रपतींच्या गादीलाच मत देऊन पसंती दिली असल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहु महाराजांनी महायुतीचे उमदेवार संजय मंडलिक यांना चारीमुंड्या चीत करुन दिल्ली गाठलीयं. मतमोजणीच्या अखेरच्या फेरदरम्यान, शाहु महाराजांना 4 लाख 82 हजार 398 मते मिळाली असून महायुतीचे उमदेवार संजय मंडलिक यांना 3 लाख 87 हजार 566 मते मिळाली आहेत. शाहु महाराजांनी 94 हजार 832 मतांचा लिड घेत संजय मंडलिक यांचा पराभव केलायं.

उदयनराजेंनी वचपा काढला :
2019 च्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांना पराभव केला होता. त्यावेळी शरद पवारांनी भर पावसात सभा घेतल्याने त्याचाच परिणाम थेट मतदानावर झाल्याचं दिसून आलं होतं. यंदा उदयनराजे यांनी पुन्हा रिंगणात उतरुन पराभवाचा वचपा काढल्याचं दिसून आलं. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांचा पराभव केलायं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार उदयनराजे भोसले यांना 3 लाख 42 हजार 268 मताधिक्य मिळालंय, तर महाविकास आघाडीचे उमदेवार शशिकांत शिंदे यांना 3 लाख 37 हजार 186 मते मिळाले आहेत. तर हातकणंगलेमध्ये मतमोजणीच्या सुरुवातीला मविआचे सत्यजित पाटील आघाडीवर होते त्यानंतर मात्र, शिवसेना (शिंदे गट) धैर्यशील माने यांनी 1 लाख 3 हजार 426 मतांचा लीड घेत विजय मिळवला. सत्यजित पाटलांना एकूण 5 लाख 6 हजार 764 मते तर धैर्यशील माने यांना 5 लाख 20 हजार 190 मते मिळालीत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण राज्यात सध्या महाविकास आघाडीचाच वरचष्मा असल्याचं दिसून आलं असून पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 10 जागांपैकी महायुतीला 4 जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाणी पाजल्याचं चित्र दिसून आलंय.

follow us

वेब स्टोरीज