अजित पवारांचे अपघात प्रकरण सातत्याने लावून धरणाऱ्या (NCP) आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. पार्थने व्हीएसआर विमानातून प्रवास केला, तर एका कार्यक्रमात सुनेत्राकाकी या नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्या शेजारी बसल्याने या विषयावर कुणाशीही चर्चा करायची इच्छा नसल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी व्हीएसआर विमानातून प्रवास केल्याचं समोर आलं. याच कंपनीच्या विमानातून प्रवास करताना अजित पवारांचा अपघात झाला होता. आमदार रोहित पवारांनी त्यानंतर व्हीएसआर कंपनीवर अनेक आरोप केले होते. तर दुसरीकडं, या विमानाच्या मालकाचे आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांचे संबंध असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला होता. दरम्यान, सुनेत्रा पवारांनी जर अजितदादांच्या अपघाताची चौकशी लावली तर त्यांचा सत्कार करेन असंही रोहित पवार म्हणाले.
आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्याशेजारी बसल्याचं दिसून आलं. त्यानंतर आमदार रोहित पवारांनी त्यावर जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. पार्थ पवारने व्हीएसआर विमानातून प्रवास केला. तर काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार या राममोहन नायडू यांच्याशेजारी बसल्याचं दिसून आलं. या विषयावर मी कुणाशीही चर्चा केली नाही, तशी इच्छादेखील नाही असंही ते म्हणाले.
अजितदादांच्या अपघाताच्या प्रश्नी आम्ही न्यायालयात जातोय, सीआयडीकडे जातोय. लोकांपर्यंत जाऊन प्रामाणिकपणे लढतोय. असं असताना या गोष्टी समोर दिसतात त्यावेळी आम्ही लढायचं की नाही असा प्रश्न पडतो. अजितदादांच्या अपघाताची केस जर येत्या 28 मे पर्यंत सीबीआयला राज्य सरकारने सुपूर्त केली तर मी स्वतः सुनेत्राकाकींचा सत्कार करेन, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं.
तटकरेंच्या भेटीत चर्चा काय?
दोन दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. ही भेट पवारसाहेबांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी घेतली होती अशी माहिती तटकरेंनी दिली. त्यावर रोहित पवार म्हणाले, मला जी माहिती मिळाली त्यानुसार सुनील तटकरे यांच्यासोबत प्रफुल पटेलही त्यावेळी उपस्थित होते. परंतु, पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसेल. ती भेट केवळ तब्येतीची चौकशी करण्यासाठी झाली असेल असंही ते म्हणाले.
