Download App

आणखी एका पुतण्याचे काकांना आव्हान! अजितदादांविरोधात शड्डू ठोकणारे युगेंद्र पवार कोण आहेत?

“माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील” अजितदादांनी (Ajit Pawar) हा दावा करुन आठ दिवस होत नाहीत तोवर त्यांच्याविरोधात आणखी एका पुतण्याने शड्डू ठोकला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यानंतर अजित पवार यांचा दुसरा पुतण्या युगेंद्र पवार हे ही शरद पवार यांना पाठिंबा देत सक्रिय राजकारणात उतरणार आहेत. युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यालयात आले होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळीच त्यांनी आपण सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पण हे युगेंद्र पवार आहेत तरी कोण? अजित पवार यांचा पुतण्या याव्यतिरिक्त त्यांची ओळख काय आहे? आतापर्यंत महाराष्ट्रात त्यांचे नाव का माहिती नव्हते? असे अनेक सवाल सध्या विचारले जात आहेत. (Who is Yugendra Pawar challenging Deputy Chief Minister Ajit Pawar)

पाहुया कोण आहेत युगेंद्र पवार?

गोविंदराव आणि शारदाबाई पवार यांना सात मुले आणि चार मुली. यात सगळ्यात थोरले वसंतराव पवार. ते उत्तम वकील होते. सोबतच राजकारणातही होते. ते शेकापचे काम करायचे. दुसरे आप्पासाहेब त्याकाळी बी. एस्सी. झाले होते. कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले होते. तिसरे अनंतराव उमदे, हरहुन्नरी, उत्तम व्यंगचित्रकार आणि गायक होते. चौथे माधवराव उद्योजक होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. पाचवे सूर्यकांत लंडनला स्थायिक झाले. ते प्रख्यात आर्किटेक्ट होते. त्यांच्यानंतर शरद पवार आणि शेवटचे प्रतापराव पवार. मुलींमध्ये सरोज पाटील, मीना जगधने, सरला जगताप आणि नीला सासणे.

यातीलच अनंतराव पवार यांना दोन मुले आणि एक मुलगी. मुलगा श्रीनिवास आणि अजित. तर मुलगी विजया पाटील. अजित पवार यांना जय आणि पार्थ अशी दोन मुले तर श्रीनिवास यांच्या मुलाचे नाव युगेंद्र. थोडक्यात अजित पवार यांच्या सख्ख्या भावाच्या मुलगा म्हणजे युगेंद्र पवार!

म्हणजेच आता अजित पवार यांचा सख्खा पुतण्या हाच आता त्यांच्या विरोधात उभा राहिला आहे. युगेंद्र हे अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी म्हणून ओळखले जातात. ते आधी मुंबईत होतो. नंतर पुण्यात आले.त्यानंतर अमेरिका आणि युरोपात गेले. जवळपास सात ते आठ वर्षे देशाबाहेरच होते. परत आल्यानंतर सुरुवातीला मुंबईत व्यवसाय पहायला लागले. त्यानंतर चार वर्षांपूर्वी विद्या प्रतिष्ठान येथे त्यांची निवड झाली. चार वर्षांपासून ते बारामतीमध्ये सक्रिय झाले.

चंदीगड : विनोद तावडेंची सलग तिसऱ्या वर्षी चालाखी… पण सर्वोच्च न्यायालयाने डाव उधळला!

सध्या बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी युगेंद्र यांच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने युगेंद्र पवार यांनी बारामतीत कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे बारामतीत भव्य पोस्टर्स लागले होते. त्यावर शरद पवार आणि युगेंद्र यांचेही फोटो होते. त्याशिवाय ते विविध पदावर काम करत आहेत. ते शरयू अॅग्रोचे ते सीईओ आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे हे खजिनदारही आहेत. बारामतीतील सामाजिक कार्यक्रमातही ते सक्रिय असतात. ते चांगले संघटक असल्याचेही सांगितले जाते. तरुणांना राजकारणात आणण्यासाठी युगेंद्र यांचे नेहमीच प्रयत्न असतात.

“शरद पवार म्हणतील तसं…” : रोहित पवारांपाठोपाठ आणखी एक पुतण्या अजितदादांविरोधात मैदानात

युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या पहिल्या दिवसापासूनच शरद पवार यांना साथ दिली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते शरद पवार यांना भेटायला सिल्व्हर ओकवर गेले होते. याशिवाय शरद पवार यांचे फोटो, व्हिडीओ आणि भाषणे सातत्याने सोशल मीडियावर शेअर करून आजोबांची बाजू जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आताही साहेबांनी सांगितले तर मतदारसंघात दौरे करणार असल्याचे सांगत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुप्रिया सुळेंचा प्रचार करत राजकारणात होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळेच आता शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार यांच्यानंतर युगेंद्र यांनीही राजकारणात ओळख मिळविण्यास सुरुवात केली आहे असे म्हणावे लागेल.

follow us