ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली, अर्ध्यापेक्षा जास्त खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का देण्याची रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Untitled Design 38

Untitled Design 38

Will Thackeray’s MP join Shinde’s Shiv Sena? : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का देण्याची रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या लोकसभेतील 9 खासदारांपैकी निम्म्याहून अधिक खासदार सध्या शिंदे गटाच्या संपर्कात असून, ते लवकरच सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या संसदीय बळावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली पक्षसंघटना अधिक भक्कम करण्यासाठी आणि संसदेत संख्याबळ वाढवण्यासाठी हे मिशन हाती घेतल्याचे बोलले जात आहे.

शिंदे यांना नुकताच झालेला दिल्ली दौरा या हालचालूनमागे असल्याची कुजबुज सध्या सुरू आहे. या दौऱ्यात त्यांनी आपल्या विद्यमान खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत संभाव्य पक्षप्रवेश, राजकीय समीकरणे आणि पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा झाल्याचं समजतंय. या संभाव्य पक्षांतरात कोणत्याही कायदेशीर अडचणी येऊ नयेत, यासाठी शिंदे गटाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. इच्छुक खासदारांची यादी तपासून त्यावर कायदेशीर सल्ला घेतला जात असून, पक्षांतर विरोधी कायद्याचे सर्व पैलू लक्षात घेऊन पुढील पावले उचलली जात आहेत. दिल्लीतील हा हालचालींमुळे शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढल्याची चर्चा आहे, तर ठाकरे गटासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राहुरी पोटनिवडणूक अटीतटीची; कर्डिले, विखे की तनपुरे कोण मारणार बाजी? नवीन अहवालाने वाढली इच्छुकांची धाकधूक

दरम्यान शिंदे गट सध्या योग्य वेळेची वाट पाहत असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य फुटीमुळे केवळ ठाकरे गटाचे संसदेतील बळ कमी होणार नाही, तर राज्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरील विरोधी आघाडीवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. जर हे खासदार प्रत्यक्षात शिंदे गटात सामील झाले, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का असेल. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे असली शिवसेना असल्याचे दावे अधिक बळकट होतील.

2024च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून निवडून आलेले खासदार

दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाई, ईशान्य मुंबईमधून संजय दीना पाटील, परभणीमधून संजय जाधव, धाराशिवमधून ओम राजेनिंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, यवतमाळ-वाशीम मधून संजय देशमुख आणि हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर हे निवडून आले आहेत. पुढील काही दिवसांत या घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

Exit mobile version