इन्स्टाग्रामवर देव-देवतांच्या नावाने (Beed) धार्मिक माहिती देत एका गृहिणीचा विश्वास संपादन करून, जादूटोणा करण्याची तसेच पतीला जिवे मारण्याची धमकी देत तब्बल १ लाख ३७ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथील सागर जोशी आणि जिगर गजानन जोशी या दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रविवारी (२ ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहणाऱ्या उषा खामकर (वय ३१) यांची सुमारे दीड महिन्यापूर्वी ‘श्री स्वामी समर्थ’ नावाच्या इन्स्टाग्राम खात्याच्या माध्यमातून सागर जोशी व जिगर गजानन जोशी यांच्याशी ओळख झाली होती. सुरुवातीला त्यांनी देव-देवतांशी संबंधित धार्मिक माहिती देत विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगून त्यांनी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.
नाराज नगरसेवक, बदलती समीकरणे आणि क्षीरसागर बंधूंची संभाव्य एकजूट; बीड नगरपरिषदेत सत्तांतराची चर्चा
पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी गृहिणीला फोनवरून धमकावण्यास सुरुवात केली. “पैसे दिले नाहीस तर तुझ्यावर जादूटोणा करून तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू, तुझ्या पतीला जिवे मारू आणि तुला भीक मागण्याची वेळ आणू,” अशी भीती दाखवत आरोपींनी तिचे मानसिक खच्चीकरण केले. या धमक्यांमुळे घाबरलेल्या गृहिणीने टप्प्याटप्प्याने आरोपींना एकूण १ लाख ३७ हजार रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सततच्या आर्थिक फसवणुकीला आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर संबंधित गृहिणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सागर जोशी आणि जिगर गजानन जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
