Lok Sabha Election : सांगली लोकसभेच्या जागेवरून राज्यभरात नाही तर देशभरात चर्चा झाली. आज शरद पवार यांनी आपल्या सांगलीच्या भाषणात सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला गेली हे टीव्हीवरून कळालं असं सांगितलं. तसंच, चर्चा न होता ही जागा जाहीर झाली असा थेट खुलासाही शरद पवार यांनी केला आहे. दरम्यान, आज महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नवीनच दावा केला आहे.
तर विश्वजीत कदमला जागा सोडली असती
यावेळी सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ही हुकुमशाही संपवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. जर मला पहिल्या दिवशी कळालं असतं की सांगली लोकसभेची जागा काँग्रस विश्वजीत कदम यांना सोडणार आहे, तर मी सांगलीची जागा सोडली असती असा नवा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसंच, तेव्हढ प्रेम आणि अधिकार आहे म्हणून मी हे बोलतोय असंही ठाकरे म्हणाले. परंतु, आपण या विषयावर एक पाऊल पुढ गेलं पाहिजे असंही ते म्हणाले.
ही जागा जिंकणारचं आहोत
जर तुम्हाला वाटत असेल की या जागेवर शिवसेनेने कब्जा केला आहे. आमचं भविष्य धोक्यात येईल. पण तुम्हाला सांगतो मी तुमचा हक्क ओरबडायला आलो नाही. मी युतीत असताना ही जागा ज्यांनी ओरबाडली ती जागा हिसकावायला आलोय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपलाही आव्हान दिलं आहे. तसंच, दोनवेळा महाराष्ट्र केसरी जिंकलेला हा मल्ल आहे. तो काही लेचापेचा नाही. असं म्हणत सांगलीची जागा आम्हाला जिंकायचीच आहे असा दावाही ठाकरे यांनी यावेळी केला आहे.