मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या समर्थनार्थ चोपडा न्यायालयाबाहेर घोषणाबाजी करणारे 40 कार्यकर्ते अडचणीत आले आहेत. मनाई आदेशाचे उल्लंघन करुन एकत्र येत घोषणाबाजी केल्याने भाजपच्या (BJP) 40 कार्यकर्त्यांवर उल्हासनगरमधील सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पुरुष आणि काही महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. (A case has been registered against 40 workers who raised slogans outside Chopda court in support of BJP MLA Ganpat Gaikwad)
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच केलेल्या गोळीबारानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सध्या गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, यानंतर गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली असून सर्वांना न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याच दरम्यान, आमदार गायकवाड यांना उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले होते. यावेळी 40 कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. मनाई आदेशाचे उल्लंघन करुन एकत्र येत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे भाजपाच्या पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांवरती उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
‘कोण आला रे कोण आला, कल्याणचा वाघ आला’, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, ‘गणपत शेठ आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, गरीबों का नेता कैसा गणपत शेठ जैसा हो, अशा घोषणा हे कार्यकर्ते देत होते. यावरुन पोलीस उपायुक्त विशेष शाखा आणि शहर यांच्याकडील मनाई आदेशाचा भंग केल्याचा दावा करत या कार्यकर्त्यांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(3) 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगरच्या द्वारली गावातील 50 एकर जागेवरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता. हिललाईन पोलिसांनी काल दोघांनाही बोलावले होते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोघांतील वाद विकोपाला गेला. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात महेश गायकवाड यांचे मित्र राहुल पाटील सुद्धा जखमी झाले.