Download App

शेजाऱ्याचा ‘कार्यक्रम’ उधळून लावण्यासाठी मुंबई गॅसवर; मंत्रालयात धमकीचा फोन करणाऱ्याला अटक

मुंबई : एक-दोन दिवसांत शहरात दहशतवादी हल्ला’ होईल, असे सांगून मंत्रालयाला धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्रकाश किशनचंद खेमाणी (61) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो कांदिवली पश्चिमच्या मथुरा दास रोड परिसरात राहतो. शेजाऱ्यांकडे होणारा कौटुंबिक कार्यक्रम खराब करण्यासाठी त्याने हा प्रकार केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. (A person who made a threatening phone call to the ministry that there will be a terrorist attack in Mumbai, was arrested)

याबाबत कांदिवली पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, प्रकाश खेमाणी राहत असलेल्या सोसायटीत एक कार्यक्रम होणार आहे. याची सध्या जोरदार तयारी सध्या सुरू आहे. हिच बाब खेमाणी याला समजल्यानंतर त्याने सोमवारी रात्री 10 वाजता मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षावर फोन केला. त्यात त्याने येत्या एक-दोन दिवसात शहरात दहशतवादी हल्ला होणार आहे, अशी धमकी दिली. याची माहिती मंत्रालय नियंत्रण कक्ष प्रतिनिधींनी तातडीने मुंबई पोलिसांना दिली.

लोकपाल विधेयक कधी मंजूर होणार? अण्णा हजारेंच्या भेटीनंतर मंत्री विखेंनी सांगितली डेडलाईन

पुढे तांत्रिक तपासात आरोपी हा कांदिवली पश्चिमचा राहणारा असल्याचे उघड झाले. त्यानुसार परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप विश्वासराव, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत गीते आणि पथक तपास करत खेमाणीच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्याला कांदिवली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. खेमाणी हा इथे तिथे फिरून कचरा गोळा करतो आणि त्याच्या घरात आणून ठेवतो. त्यामुळे पोलिस जेव्हा त्याच्या घरात गेले तेव्हा त्याठिकाणी त्यांना सर्वत्र कचरा जमा असल्याचे दिसले.

‘मग, अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का?’ PM मोदींच्या टीकेवर राऊतांचा थेट सवाल

यापूर्वी कांदिवली पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात शेजाऱ्यांना मारहाणीच्या दोन तक्रारी आल्या आहेत. त्यावरून हा फोन ‘हॉक्स कॉल’ असल्याचे उघड झाले. मात्र त्याच्या सोमवारी रात्रीच्या कॉलने मुंबई पोलिसांना रात्रभर कामाला लावले. पुढे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारणा केल्यावरही त्याची आरेरावीची भाषा होती. “हा मैनेही फोन किया, तो क्या हुआ”, असे म्हणत तो वाद घालू लागला. त्यांनी त्याला त्याच्या घरच्यांबाबत विचारणा केल्यावर “कोई नही रहता मेरे साथ, सब छोड़ के चले गये..” असे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, एकूण त्याच्या वर्तनावरुन आणि राहण्याच्या पद्धतीवरुन तो मनोरुग्ण असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Tags

follow us