पुणे : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटावरून वाद सुरू आहे. त्याचे पडसाद पुण्यात देखील उमटताना दिसत आहे. पठाण चित्रपटावरून पुण्यात बजरंग दल आक्रमक झाले असून पुण्यातील राहुल चित्रपटगृहाबाहेर असलेले पठाण चित्रपटाचे पोस्टर्स बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे.
पठाण चित्रपटातील बिकिनी दृष्यावरून हिंदुत्ववादी संघटनानी विरोध केला होता. तो विरोध अजूनही थांबत नाहीय. दरम्यान हा चित्रपट रिलीज न करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. अशातच आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील राहुल चित्रपटगृहाबाहेर शाहरुख खानच्या काही फॅन्स ने पठाण चित्रपटाचा पोस्टर लावला होता. ते पोस्टर बजरंग दलाने काढले आहेत.
पठाण चित्रपटावरून बजरंग दल आक्रमक झाले आहे. शिवाजीनगर येथील राहुल चित्रपटगृहाबाहेरील बजरंग दलाने पोस्टर्स काढले होते पण शाहरुख खानच्या काही फॅन्सने चित्रपटगृहा बाहेर हे पोस्टर पुन्हा लावले होते. यानंतर बजरंग दलाकडून राहुल थिएटरच्या चालकांना इशारा देऊन पोस्टर काढण्याची विनंती केली. त्यानंतर हे भलेमोठे पोस्टर लगेच हटवण्यात आले. पठाणचा हा वाद आता अजून किती चिघळणार हे येणाऱ्या काळात कळेल.