मुंबई : ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील (Mumbai) सर्व बांधकाम तुर्तास बंद ठेवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. विकासकामांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे काही दिवस बांधकाम बंद राहिले तर आभाळ कोसळणार आहे का? असा सवाल करत न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. यावेळी शिंदे सरकार (Eknath Shinde) आणि मुंबई महापालिकेकडून बांधकाम सुरु ठेवण्यासाठी विनंती करण्यात आली, मात्र न्यायालयाने आर्थिक नुकसानापेक्षा लोकांचा श्वास महत्त्वाचा असल्याचे म्हणत ही विनंती फेटाळून लावली. (Ban on all constructions Work in Mumbai by High Court)
मुंबई आणि दिल्लीतील हवेची गुणवत्ता (Air Quality index) मागील काही दिवसांपासून ढासळला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ मुंबईतील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली. सोबतच जेष्ठ कायदेतज्ज्ञ दरायस खंबाटा यांची अमायकस क्युरी (कोर्टाचा मित्र) म्हणून नियुक्ती केली. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती देंवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली.
यावेळी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहात तातडीच्या उपाययोजना तात्काळ सुरू कराव्यात. बईतील सर्व बांधकाम तुर्तास बंद ठेवण्यात यावे. विकासकामांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे काही दिवस बांधकाम बंद राहिले तर आभाळ कोसळणार आहे का? येत्या शुक्रवारपर्यंत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास दिवाळीचे चार दिवसही बंदी कायम राहणार आहे, असेही न्यायालयाने बजावले आहे. यावेळी फटाक्यांवर बंदी घालण्याची इच्छा नाही, मात्र याबाबत न्यायलयाने घालून दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करा, अशा सुचनाही न्यायालयाने दिल्या आहेत.
जगातील सर्वाधिक प्रदूषित हवा असलेल्या शहरांमध्ये दिल्ली अव्वलस्थानी आहे. सध्या धूर-धुळीमुळे दिल्लीचे आकाश पूर्णपणे झाकोळले आहे. आणखी दोन आठवडे तरी हीच परिस्थिती कायम राहील, असे बोलले जात आहे. दरम्यान, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत केजरीवाल सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले.
केजरीवाल सरकारने दिवाळीनंतर एक आठवडा सम-विषम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत सम-विषम लागू करण्याची घोषणा केली आहे. शिवाय सर्व शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीत बीएस-3 पेट्रोल आणि बीएस-4 डिझेल कारवर बंदी घातली आहे. राज्यातील सर्व भागात फटाक्यांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी दिल्ली सरकारने 210 पोलिस पथके तयार केली आहेत. सोबतच दिल्लीत अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.