Maharashtra Legislative Assembly Speaker : राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची (Kalidas Kolambkar) नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन हंगामी विधानसभेच्या अध्यक्षांना शपथ देतील. आज दुपारी एक वाजता राजभवनात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष पद भूषवणार आहेत. पुढील तीन दिवसीय अधिवेशनात कोळंबकरांकडे हंगामी अध्यक्ष पदाची जबाबदारी राहील. पहिल्या दोन दिवसांत नवनिर्वाचित आमदारांना ते शपथ देतील. ९ डिसेंबररोजी नव्या अध्यक्षाची निवड होईल. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल.
मुंबईकरांच्या मनात भाजप! सर्वाधिक १६ जागा जिंकत ठरला मोठा भाऊ; ठाकरे गट दुसरा
आमदार कोळंबकर आज दुपारी राजभवनात जाऊन शपथ घेतील. विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे. 7 ते 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशना दरम्यान हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष अधिवेशनात आमदारांना शपथ दिल्यानंतर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.
विधानसभेचा हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेण्यास पक्षाने मला सांगितलं आहे. त्यामुळे आज दुपारी मी राजभवनात शपथ घेणार आहे. आता पुढे विधानसभेचा अध्यक्ष म्हणून कायम ठेवायचं की नाही याचा निर्णय पक्ष करेल. मात्र मी माझी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलून दाखवली आहे असे भाजप आमदार कालिदास कोळंबरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राणे, चव्हाण, फडणवीस अन् शिंदे.. कहाणी चार मुख्यमंत्र्यांच्या डीमोशनची