आम्ही संविधान आणखी मजबूत करू; वाकडमध्ये रामदास आठवलेंची जोरदार सभा
PCMC Election 2026: उमेदवारांवर आधारीत कवितेने आठवले यांनी भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटाने त्यांना दाद दिली.
PCMC Election 2026: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काही लोक केंद्र सरकार संविधान बदलणार असल्याची खोटी अफवा पसरवीत आहेत. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही संविधान आणखी ते मजबूत करणार आहे. त्यामुळे भाजपाच्या (BJP) विकासाला मत द्या असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale) यांनी शनिवारी वाकड येथे केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ( PCMC Election 2026) प्रभाग क्रमांक 25 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे, श्रुती वाकडकर, रेशमा भुजबळ व कुणाल वावळकर यांच्या प्रचारार्थ वाकडीतील सम्राट चौकात कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. श्रुती राम वाकडकर म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकासाची भूमिका स्पष्ट केलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम, प्रामाणिक व विकासाभिमुख नेतृत्व हेच या निवडणुकीचे अधिष्ठान आहे.
राहुल कलाटे म्हणाले, अनेक वर्षांपासून येथील आमचे रहिवाशांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अहोरात्र आम्ही त्यांच्या सेवेसाठी झटतोय. वाकडचे प्रथम नगरसेवक म्हणून माझे वडील त्यानंतर आई आणि मीही प्रतिनिधी म्हणून जनतेची नि: स्वार्थ सेवा करत आहे. मागील काळात प्रभागाचा सूनियोजीत विकास साधत विविध आरक्षणे विकसित केली आहेत. या पुढेही श्रुती वाकडकर, कुणाल वाव्हळकर, रेश्मा भुजबळ यांच्या साथीने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार आहे. त्यासाठी संपूर्ण पॅनल निवडून आणणार आहे.
भाजपचे धोरण नेहमीच विकास, सुशासन, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणारे राहिले आहे. त्याच धर्तीवर भाजप फक्त सत्तेसाठी नव्हे, तर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, हा विश्वास जनतेत अधिक दृढ झाल्याने यंदाही महापालिकेत बहुमताने भाजपाची सत्ता येणार आणि जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार आहोत, असे श्रुती राम वाकडकर यांनी म्हटलंय.
उमेदवारांवर कविता… टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद…
उमेदवारांवर आधारीत कवितेने आठवले यांनी भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटाने त्यांना दाद दिली. कलाटेंसह श्रुती वाकडकर, कुणाल वाव्हळकर आणि रेश्मा भुजबळ या चौघा उमेदवारांवर त्यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर केली. राहुल कलाटे यांच्या नेतृत्वावरती ठाम विश्वास व्यक्त करीत राहुल कलाटे हे संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आणतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
